

पुणे: निंबोणीच्या झाडामागे, अरे संसार संसार, नाविका रे वारा वाहे रे, केशवा माधवा, सांग कधी कळणार तुला, अशा असंख्य अजरामर गीतांनी मराठी मनाला स्वरांची श्रीमंती बहाल करणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी दै. 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने सुमनांजली या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सुरेल आणि भावस्पर्शी संगीत सोहळा शुक्रवारी (दि. ३ जुलै) सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. या संगीत सोहळ्यात सुमनताईंच्या अजरामर गीतांचा सुरेल ठेवा रसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे आहेत, तर भारती विद्यापीठ आणि अमित एंटरप्रायझेस हे सहप्रायोजक आहेत.
भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे सुमन कल्याणपूर. लतादीदींच्या समकालीन असतानाही त्यांनी आपल्या स्वतंत्र गायनशैलीने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजातील कोमलता, शब्दोच्चारातील स्पष्टता, भावनांचे अचूक प्रकटीकरण आणि स्वरांतील निर्मळ माधुर्य यामुळे त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे स्वर आजही असंख्य रसिकांच्या मनात निनादत आहेत. त्यांच्या समृद्ध सांगीतिक वारशाला आणि संगीतविश्वातील अमूल्य योगदानाला कृतज्ञ अभिवादन करण्याच्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या विशेष संगीत सोहळ्यात सुमनताईंच्या कारकिर्दीतील निवडक आणि लोकप्रिय गीतांचा बहारदार नजराणा रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. त्यांच्या गायकीतील विविध पैलू उलगडणारी प्रेमगीते, भावगीते, भक्तिगीते तसेच चित्रपट संगीतातील अनेक गाजलेली गीते या कार्यक्रमातून ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ एक संगीत मैफल न राहता, सुमनताईंच्या स्वरविश्वाचा अनुभव देणारा एक सांस्कृतिक उत्सव ठरणार आहे. या कार्यक्रमात गायिका मधुरा दातार, श्रुती देवस्थळी, चिन्मयी तांबे तसेच गायक केतन गोडबोले हे कलाकार सुमनताईंची गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे विश्लेषणात्मक निवेदन आणि गायन अपर्णा संत करणार असून, त्या सुमनताईंच्या सांगीतिक प्रवासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत. त्यामुळे गीतांसोबतच त्या काळातील संगीतविश्व, संगीतकार, गीतकार आणि सुमनताईंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या आठवणींचाही रसिकांना वेध घेता येणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक हे सुमनताईंची निवडक गीते स्वतंत्ररीत्या सुरेल बासरीवादनातून सादर करणार आहेत. तसेच इतर गीतांनाही त्यांची साथ असेल. ओक यांच्याबरोबर केदार परांजपे, मिलिंद गुणे, विशाल गंड्रतवार, अजय अत्रे हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाची ध्वनीव्यवस्था मोहित नामजोशी यांच्या मार्गदर्शनात असेल, तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी विक्रम साऊंड, पुणे हे सांभाळणार आहेत. संगीताच्या माध्यमातून एका महान कलावंताला वाहण्यात येणारी ही स्वरांजली पुणेकर रसिकांसाठी संस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
कार्यक्रम कधी आणि कुठे?
दिनांक: शुक्रवारी, ३ जुलै
वेळ: सायंकाळी ५ वाजता
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
पुण्यात चार ठिकाणी मिळतील मोफत प्रवेशिका
मोफत प्रवेशिका शुक्रवारपासून (दि.२६) उपलब्ध असतील.
दैनिक पुढारी कार्यालय, मित्रमंडळ चौक - सकाळी १० ते सायंकाळी ६.
देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रस्ता
ग्राहक पेठ, टिळक रस्ता
महर्षी कर्वे पुतळ्याजवळ सक्सेस स्क्वेअर सोसायटीतील मोदी केअर दालन