Ketan Agarwal Murder Case Pudhari
पुणे

Ketan Agarwal Murder Case: लोहगड हत्याकांड: चेतन चौधरी आधीच किल्ल्यावर; सीसीटीव्हीतून तपासाला नवी दिशा

केतन अगरवाल प्रकरणात पोलिस तपासातून घटनाक्रम उलगडत असून सीसीटीव्ही व फॉरेन्सिक पुराव्यांवर तपास केंद्रित झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केतन अगरवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी अगोदरच लोहगड किल्ल्यावर पोहचला होता. किल्ल्यावर प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. तेथील सुरक्षारक्षकाने चेतनला तिकीटाबाबत विचारले. त्यावेळी त्याने आपण व्यायामासाठी वरती जात असून, परत आल्यावर तिकिटाचे पैसे देतो, असे सांगितले. मात्र, त्याने २५ रुपयांचे शुल्क भरले नसल्याचे समोर आले आहे. कदाचित पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली असल्याचा अंदाज आहे.

सिया आणि केतन हे दोघे १८ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता मोटारीने लोहगडकडे निघाले. हे अगोदरच चेतनला माहीत होते. त्यामुळे तो हे दोघे येण्यापूर्वीच किल्याच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर जाऊन बसला होता. हे दोघे किल्ल्यावर गेले की तो त्यांच्या पाठीमागून वरती जाऊ लागला. मात्र, किल्ल्यावर जाण्यासाठी २५ रुपये शुल्क भरून तिकीट घ्यावे लागते. सुरक्षारक्षकाने चेतनला हटकले. यावेळी तो म्हणाला, मी व्यायामासाठी आलो असून, वरती जात आहे. परत खाली येताना पैसे देतो. त्यानंतर तो वरती गेला. मात्र, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्याची छबी अचूक टिपली होती. हीच छबी पुढे पोलिसांच्या तपासाची महत्त्वाची दिशा ठरली. त्याच्या पेहरावावरूनच पोलिसांनी त्याला निष्पन्न केले.

सिया आणि केतन किल्ल्यावर पोहोचताच चेतन त्यांच्या पाठीमागून वरती आला. संधी मिळताच सिया आणि चेतन या दोघांनी केतनला कड्यावरून खाली दरीत ढकलून दिले. त्यावेळी किल्ल्यावरील कोणाच्याही नजरेत हा प्रकार आला नव्हता. विशेष म्हणजे त्या ठिकाणी ना सुरक्षारक्षक होते ना इतर दुसरे कोणी पर्यटक किंवा ट्रेकिंगसाठी आलेली लोकं. दोघांनी आपले काम फत्ते केले होते. त्यामुळे ते निर्धास्त झाले होते. परंतु आता त्यांना केतन हा कड्यावरून खाली पडला हे ओरडून सांगायचे होते.

सियाने सुरुवातीला आरडाओरडा करत सुरक्षारक्षकाला सांगितले. तिनेच तिची आई पूजा गोयल यांनाही केतन किल्ल्यावरून खाली पडल्याचे सांगितले. त्यानंतर केतनच्या कुटुंबीयांनी लोहगडाकडे धाव घेतली. तोपर्यंत पोलिस, स्थानिक नागरिकांनी केतनला बेशुद्ध व जखमी अवस्थेत खंडाळा येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी केतन अगरवालच्या खूनप्रकरणी अटक केली असून, न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी, दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

पोलिस अधीक्षक गिल्ल यांनी केली घटनास्थळाची पाहाणी

केतन अगरवाल याला लोहगड किल्ल्यावरील ज्या ठिकाणावरून ढकलले तेथे बुध‍वारी (दि.२४) पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांन भेट दिली. यावेळी फॉरेन्सिक पथक देखील होते. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी केतनचा खून कसा केला याचे पोलिस सिनरिक्रेशन देखील करण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेची पथके किल्ल्यावर होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT