कोरेगाव भीमा: हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायतीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ग्रामपंचायतीसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी कचऱ्याची मिरवणूक काढत ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत मोर्चा नेला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक स्वरूपात कचरा ओतून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलना दरम्यान ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्या खुर्चीला कचऱ्याचा हार घालून संतप्त आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
कुशल सातव यांनी यापूर्वीच या प्रकरणात सुमारे २.११ कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार ग्रामविकास विभागाकडे केली असून, दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.