Kerosene Distribution Maharashtra Pudhari
पुणे

Kerosene Distribution Maharashtra: राज्यात रॉकेल वितरण पुन्हा सुरू? ३७.४४ लाख लिटर कोटा निश्चित

गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय; मात्र लाभार्थी व वितरणाबाबत अजूनही संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यात मागील काही वर्षांपूर्वी शिधापत्रिकेवरून बंद करण्यात आलेले रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील शिधापत्रिकांची संख्या मागविण्यात आली आहे.

पूर्वीच्या परवानाधारकांची संख्या, परवान्याचे नूतनीकरण, नवे अर्ज याचीही माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, हे रॉकेल सर्वच दुकानदारांना द्यायचे की, केवळ परवानाधारकांना द्यायचे, तसेच अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांनाच द्यावे, यावरून प्रशासन आणि दुकानदारांमध्ये संभम आहे. राज्य सरकारकडूनच याबाबत स्पष्ट निर्देश आल्यानंतर लाभार्थ्यांची आणि दुकानदारांची संख्या निश्चित होईल, असे सांगण्यात येत आहे.

राज्यात 2005 पासून शिधापत्रिकांवरील रॉकेलच्या वितरणात घट करण्यास सुरुवात झाली. तर, पुण्यासारख्या मोठ्या शहरात 2015 पासून रॉकेलचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले. मात्र, दोन वर्षांपर्यंत काही जिल्ह्यात याचे वितरण सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने पुन्हा एकदा रॉकेलचे वितरण सुरू करण्याचे ठरविले आहे, त्यासाठी राज्याचा एकत्रित कोटा ठरविला आहे.

रॉकेल वितरणाची यंत्रणा कार्यान्वित नसल्याने लाभार्थ्यांना रॉकेल वितरित करण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परवान्यांचे नूतनीकरण व नव्या मंजुरी देणे आवश्यक असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी किरकोळ, हॉकर्स, अर्धघाऊक व घाऊक रॉकेल परवाने मंजुरी, नूतनीकरण व वारसाच्या नावे वर्ग करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रॉकेल परवान्याबाबतचे महत्त्वाचे निकष

परवान्याची मुदत संपून रॉकेल परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केलेल्या, मात्र नूतनीकरणासाठी प्रलंबित असलेल्यांचे नूतनीकरण झाले आहे, असे गृहित धरावे.

परवाना मंजुरी देताना नूतनीकरण करण्यासाठी आकारण्यात येणारे अर्ज, परवाना, नूतनीकरण, विलंब शुल्क आकारू नये. दोन वर्षांपेक्षा अधिक मात्र पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या विलंबाच्या प्रकरणांबाबत राज्य सरकारऐवजी जिल्हाधिकारी स्तरावरच कार्यवाही करावी.

वारसाच्या नावे वर्ग करण्यासाठी प्रलंबित असलेले परवाने तत्काळ वर्ग करावेत. ज्या गावामध्ये किरकोळ रॉकेल परवानाधारक उपलब्ध नाहीत, अशा गावांमध्ये रास्त धान्य दुकानदारास परवाना देण्यात यावा.

अंत्योदय अन्‌‍ प्राधान्य योजनेतील रेशनधारकांनाच मिळणार रॉकेल

राज्य सरकारने सर्व शिधापत्रिकांची संख्या तसेच घाऊक विक्रेत्यांची नावे कळवावीत, अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही माहिती कळविण्यात आली आहे. मात्र, रॉकेल देताना ते अंत्योदय व प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांनाच देण्यात येईल, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, अन्य केशरी आणि शुभ शिधापत्रिकाधारकांचे काय, असा सवालही काही दुकानदार आणि अधिकारी उपस्थित करीत आहेत. पूर्वी रॉकेलचे परवाने स्वस्त धान्य दुकानदारांव्यतिरिक्त वैयक्तिक व्यापाऱ्यांकडेही देण्यात आले होते. त्यांना ठराविक कोटा देण्यात येत होता. मात्र, आता स्वस्त धान्य दुकानदारांनाही रॉकेल परवाना देण्यात येणार आहे. त्यांच्याकडे साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. हे रॉकेल किती आणि कधीपासून देण्यात येईल, याची स्पष्टता नसल्याने दुकानदारांना याची व्यवस्था कशी करावी, याबाबत संभम आहे.

पुरवठा विभागाने मागितलेली माहिती पुरविण्यात आली आहे. वितरणाबाबत अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत
महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
रॉकेल परवाने आता सर्वच दुकानदारांना मोफत देण्यात येणार आहेत. दुकानदारांना किती रॉकेल मिळेल, याबाबत स्पष्टता नाही.
गणेश डांगी, अध्यक्ष रेशन दुकानदार संघटना पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT