Doctor negligence case Pudhari
पुणे

Kedgaon Surgery Death Case: केडगाव शस्त्रक्रिया मृत्यू प्रकरणात अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यूचा प्राथमिक अहवाल

रंजना केसकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असून अंतिम अहवालानंतर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेवेळी दौंड तालुक्यातील खोर गावातील रंजना बाबू केसकर यांचा मृत्यू अतिरक्तस्त्रावामुळे झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी ही माहिती दिली. दि. 25 एप्रिल रोजी केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान रंजना केसकर यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

विशेषतः सरकारी आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव संतापाची लाट उसळली. या प्रकरणात संबंधित शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनिल कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांच्या आदेशाने 5 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यामध्ये रंजना केसकर यांचा मृत्यू अतिरक्तस्रावामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मात्र, ही प्राथमिक माहिती असून, अंतिम निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना अंतिम वैद्यकीय अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश दिले. शवविच्छेदनादरम्यान रंजना केसकर यांचा व्हिसेरा राखीव ठेवल्याने अंतिम अहवाल येण्यास काही कालावधी लागू शकतो, त्यामुळे या प्रकरणातील नेमकी जबाबदारी कोणावर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

घटना अत्यंत दुर्दैवी

केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले. तसेच, या घटनेमुळे नागरिकांचा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ नये, यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT