Fetal Determination Pudhari
पुणे

Kedgaon Illegal Sex Determination Abortion Racket: केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणात आणखी दोघे जेरबंद; रॅकेटचा तपास अधिक वेगात

मुख्य सूत्रधाराच्या चालकासह पिग्मी एजंट अटकेत; आर्थिक व्यवहार आणि एजंट साखळीची चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यात गाजत असलेल्या केडगाव गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात यवत पोलिसांनी बुधवारी (दि. २४) आणखी दोघांना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार अण्णासाहेब गिरी याचा चालक अमित टेंगले आणि पिग्मी एजंट सचिन कदम यांचा समावेश आहे. त्यांना दौंड न्यायालयात हजर केले असता दोघांनाही शनिवार (दि. २७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी माहिती दिली.

दौंड तालुक्यासह राज्यभर खळबळ उडालेल्या या प्रकरणात यापूर्वी अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. गर्भलिंगनिदान, बेकायदेशीर गर्भपात आणि त्यासाठी उभारण्यात आलेल्या एजंटांच्या साखळीचा तपास यवत पोलिस करत आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्या संपर्कात होते. काही व्यक्ती गर्भलिंगनिदानासाठी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध ठिकाणी पाठविण्याचे तसेच आर्थिक व्यवहारांचे समन्वय साधण्याचे काम करत असल्याचा संशय आहे.

तपासात समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अमित टेंगले आणि सचिन कदम यांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केल्याने आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, आर्थिक व्यवहार कसे होत होते आणि गर्भलिंगनिदानासाठी महिलांना कोणत्या माध्यमातून जोडले जात होते, याचा तपास अधिक वेगाने होणार आहे.

या प्रकरणात यापूर्वी डॉक्टर, एजंट आणि इतर संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलिसांकडून जप्त केलेली कागदपत्रे, मोबाईल फोन आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.

आणखी काही जण रडारवर

गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपातासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT