केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी आणि परिसरात गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ कथितपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रॅकेटचे बिंग अखेर अंतर्गत वाद, अपहरण आणि खंडणीच्या प्रकारातून फुटल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, या कथित गर्भलिंगनिदान टोळीने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. ग््राामीण भागातील गर्भवती महिलांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जात असल्याचा आरोप परिसरात सातत्याने होत होता. मात्र, या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश कोणत्याही अधिकृत कारवाईतून नव्हे, तर टोळीतीलच अंतर्गत संघर्षातून झाल्याचे बोलले जात आहे.
अपहरण करून महाबळेश्वरला नेल्याची चर्चा
या कथित टोळीतील प्रमुख सूत्रधाराचे त्याच्याच काही साथीदारांनी अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित व्यक्तीला जबरदस्तीने महाबळेश्वर परिसरात नेण्यात आले आणि तेथे त्याच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची चर्चा आहे. ’पैसे दिले नाहीत, तर जिवाला धोका निर्माण होईल,’ अशी धमकी देण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
भीतीपोटी संबंधित सूत्रधाराने पैसे देण्याची तयारी दर्शविली; मात्र दरम्यानच्या काळात या सर्वांच्या वाहनाचा अपघात झाल्याने परिस्थिती अचानक बदलली आणि संबंधित सर्वजण तेथून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण रॅकेटमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओ क्लिप्समुळे वाढली भीती
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित सूत्रधाराच्या काही व्हिडीओ क्लिप्स त्याच्याच साथीदारांनी तयार केल्याची चर्चा आहे. या क्लिप्स भविष्यात बाहेर आल्यास संपूर्ण रॅकेट उघडे पडू शकते, अशी भीती संबंधितांमध्ये आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार काही दिवस गायब झाल्याची माहिती समोर येत असून, सध्या तो कायदेशीर सल्ला घेत असल्याचे बोलले जात आहे. हे संपूर्ण प्रकरण कसे दाबता येईल, कोणत्या माध्यमातून स्वतःची सुटका करवून घेता येईल आणि संभाव्य चौकशीपासून कसे वाचता येईल, यासाठी संबंधित व्यक्तींकडून हालचाली सुरू असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
आरोग्य विभागामध्ये संशयास्पद शांतता
इतक्या मोठ्या घडामोडी घडत असताना दौंड तालुक्यातील आरोग्य विभाग मात्र अद्यापही मौन बाळगून असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून गर्भलिंग निदानासंदर्भात परिसरात कुजबूज सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ’आरोग्य विभाग या टोळीच्या दावणीला बांधला गेला आहे का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, याच परिसरातील केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता गर्भलिंगनिदान रॅकेटची चर्चा समोर आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.