Extortion News Pudhari
पुणे

Kedgaon Dapodi Gurhal Extortion: केडगाव-दापोडीत ‘तोतया पत्रकारा’कडून गुऱ्हाळचालकांना हप्त्याची मागणी?; कारवाईच्या धमकीने वसुलीचा आरोप

महिन्याच्या हप्त्यानंतर पंधरा दिवसांनी, आता थेट आठवड्याला पैशांची मागणी; संतप्त गुऱ्हाळचालकांनी संबंधित व्यक्तीला धरले धारेवर

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: गुऱ्हाळावर कारवाई होईल, पोलिसांना फोन करतो, प्रदूषण विभागाला माहिती देतो, बातमी छापतो... अशी भीती दाखवत केडगाव-दापोडी परिसरातील गुऱ्हाळचालकांकडून एका कथित तोतया पत्रकाराकडून हप्ते मागितले जात असल्याचा गंभीर आरोप गुऱ्हाळचालकांनी केला आहे.

सुरुवातीला महिन्याला मागितला जाणारा हप्ता पंधरा दिवसांवर आणि त्यानंतर थेट आठवड्यावर आल्याने या कथित 'हप्ता वसुली'ला वैतागलेल्या गुऱ्हाळचालकांनी अखेर संबंधित व्यक्तीला जाब विचारत धारेवर धरल्याची घटना नुकतीच घडल्याचे सांगण्यात येते. राज्यात प्रशासनाकडून नियमबाह्य गुऱ्हाळांवर धडक कारवाई सुरू असल्याने गुऱ्हाळचालकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप आहे.

'साखर आहे...प्लॅस्टिक जाळता... ड्रायर नाही!'

गुऱ्हाळावर साखर साठवून ठेवली आहे, प्लॅस्टिक जाळले जाते, चोत्री सुकविण्यासाठी ड्रायर नाही, अशा विविध कारणांचा उल्लेख करून संबंधित व्यक्ती गुऱ्हाळचालकांना कारवाईची भीती दाखवत असल्याचे आरोप आहेत.'पैसे द्या, अन्यथा पोलिसांना आणि प्रदूषण विभागाला फोन करतो; तुमच्यावर कारवाई होईल,' अशा प्रकारची दमदाटी केली जात असल्याचे काही गुऱ्हाळचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी सुरुवातीला मागितलेले पैसे दिल्याचे सांगितले जाते.

महिन्याचा हप्ता... मग पंधरा दिवसांनी... आता आठवड्याला!

सुरुवातीला महिन्याचा हप्ता मागितला जात होता. काही काळानंतर पंधरा दिवसांनी पैसे मागण्यास सुरुवात झाली. एवढ्यावरच न थांबता आता आठवड्याला हप्ता मागितला जात असल्याचा आरोप गुऱ्हाळचालकांनी केला आहे.'महिन्याचा हप्ता देऊनही पंधरा दिवसांनी पुन्हा पैसे मागितले जातात; आता आठवड्याची वेळ आली. हा प्रकार कुठे थांबणार?' असा सवाल संतप्त गुऱ्हाळचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

गुऱ्हाळचालकांचा संयम अखेर सुटला!

वारंवार होणारी पैशांची मागणी आणि कारवाईची भीती यामुळे गुऱ्हाळचालकांमध्ये संताप वाढत होता. नुकतेच संबंधित व्यक्ती एका गुऱ्हाळावर गेल्यानंतर काही गुऱ्हाळचालकांनी त्याला जाब विचारला. अनेकांनी एकत्र येत त्याला धारेवर धरल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने तेथून काढता पाय घेतल्याची माहिती गुऱ्हाळचालकांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील गुऱ्हाळचालकांमध्ये या कथित प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकार की 'हप्ता वसूल करणारा'?

पत्रकारितेच्या नावाखाली गुऱ्हाळचालकांकडून पैसे मागितले जात असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संबंधित व्यक्ती कोणत्या वृत्तपत्र अथवा माध्यमाशी संबंधित आहे? त्याच्याकडे अधिकृत पत्रकार ओळखपत्र आहे का? संबंधित माध्यम संस्थेला या प्रकाराची माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गुऱ्हाळामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिस, महसूल प्रशासन किंवा प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार तपासणी करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, कारवाईच्या नावाखाली पैसे मागणे किंवा धमकावणे हा पत्रकारितेचा भाग होऊ शकत नाही.

प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी

या कथित प्रकाराची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, संबंधित व्यक्ती खरोखर पत्रकार आहे की पत्रकारितेच्या नावाखाली वसुली करीत आहे, याची पडताळणी करावी, अशी मागणी गुऱ्हाळचालकांकडून होत आहे. तसेच ज्या गुऱ्हाळांमध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे, त्यांच्यावरही संबंधित विभागांनी पारदर्शकपणे कायदेशीर कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन असेल तर कारवाई कायद्याने व्हावी; पैशांच्या देवाणघेवाणीतून नव्हे, अशी भूमिका गुऱ्हाळचालकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT