भवानीनगर: काझड (ता. इंदापूर) येथील प्रयोगशील शेतकरी व काझड ग््राामपंचायतीचे सदस्य हनुमंत नामदेव वीर यांनी उसाचे उच्चांकी एकरी 105 टन उत्पादन घेतले आहे. वीर यांनी त्यांच्या दोन एकर क्षेत्रामध्ये फुले 265 या उसाचे 210 टन उत्पादन घेतले आहे. हा ऊस बघण्याकरिता शेतकरी येत आहेत.
हनुमंत वीर यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये फुले 265 उसाच्या जातीची आडसाली लागवड केली होती. साडेचारफुटी पट्टा पद्धतीने 20 जुलै 2024 रोजी कांडी पद्धतीने उसाची लागवड केली होती. एक महिन्याने उसाची उगवण झाल्यानंतर ह्युमिक ॲसिड व 1261 ची आळवणी केली. ठिबक सिंचन पद्धतीने उसाला पाणी दिले. उसाची लागवड दोन महिन्यांची झाल्यानंतर पहिली फवारणी पाठीवरच्या पंपाने केली व ऊस सहा महिन्यांचा झाल्यानंतर दुसरी फवारणी ड्रोनच्या माध्यमातून केली.
फवारणीसाठी जिबेलिक ॲसिड सूक्ष्म अन्नद्रव्य व 19-19-19 या विद्राव्य खताची फवारणी केली. उसाच्या बाळचळीसाठी एकरी 50 पिशव्या कोंबड खत वापरले. बाळबांधणी करताना रासायनिक खतांच्य मात्रा दिल्या. यामध्ये युरियाऐवजी अमोनियम सल्फेट या रासायनिक खताचा वापर केला. त्याबरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद, पालाश, निंबोळी खत या खतांचा वापर केला. बांधणीसाठी याच खताचा वापर केला असून, बाळबांधणीपेक्षा बांधणीच्या वेळी 25 टक्के जास्त खताचा वापर केला.
दरम्यान, उसाची मोठी बांधणी झाल्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी ठिबक सिंचनमधून 19-19-19 फॉस्फरिक ॲसिड कॅल्शियम नायट्रेट आदी विद्राव्य खतांच्या आलटून मात्रा दिल्या. त्यामुळे उसाची फुगवण चांगली झाली व दोन पेऱ्यातील अंतर वाढण्यासाठी मदत झाली. उसाची लागण झाल्यापासून 16 महिन्यांनी उसाची गाळपासाठी तोड करण्यात आली. यावेळी उसाची उंची वाड्यासह 23 फुटांपर्यंत वाढलेली होती. ऊस 45 ते 50 कांड्यापर्यंत वाढला होता. एका उसाचे वजन सरासरी तीन ते साडेतीन किलोपर्यंत झाले होते. ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना विद्राव्य खतांबरोबरच तांबेरा, करपा, लोकरी मावा यांसारख्या रोगांना उसाचे पीक बळी पडू नये म्हणून बुरशीनाशक व कीटकनाशकाचा वापर केला. उसाचे उत्पादन घेताना आबासो माळवे व श्रीनिवास कदम यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती केल्यास उसाचे चांगले उत्पादन मिळू शकते. ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर न करता उसाचे विक्रमी उत्पादन मिळाल्याचा आनंद आहेच. परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर उसाचा साखर उतारा 14 टक्क्यांपर्यंत मिळतो. साखर कारखानदार मात्र 10 ते 11 टक्केच साखर उतारा दाखवतात. साखर उतारा व वजनकाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकला जात आहे.हनुमंत वीर, प्रयोगशील शेतकरी, काझड