Open Chamber Pudhari
पुणे

Kavathe Yemai Open Chamber: कवठे येमाईत उघडी चेंबर ठरताहेत ‘मृत्यूचे सापळे’

अष्टविनायक महामार्गावर सात दिवसांत दोन अपघात; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

टाकळी हाजी: अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई (ता. शिरूर) येथील येमाई मंदिर चौक परिसरात उघड्या अवस्थेत असलेल्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या सात दिवसांत या परिसरातील उघड्या चेंबरमध्ये पडून दोन अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.

शनिवारी (दि. 13) नीलेश मिंडे हे दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला असलेले उघडे चेंबर त्यांच्या लक्षात न आल्याने ते थेट दुचाकीसह चेंबरमध्ये पडले. या अपघातात त्यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी येऊन दुरुस्तीचे काम सुरू करेपर्यंत येथून न हटण्याचा निर्धार मिंडे यांनी व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मिंडे यांची समजूत काढली व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, कवठे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे यांनी सांगितले की, कवठे येमाई परिसरातील अष्टविनायक महामार्गावर सध्या चार चेंबर उघड्या अवस्थेत असून त्यांच्या झाकणांची अवस्था अत्यंत खराब आहे.

यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत असून प्रवासी भीतीच्या वातावरणात प्रवास करत आहेत. यासंदर्भात महामार्गाचे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे उघडे चेंबर प्रवाशांसाठी ‌‘मृत्यूचे सापळे‌’ ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT