BJP NCP Pudhari
पुणे

Katraj Ward Election Result: प्रभाग ३८ मध्ये भाजपचे वर्चस्व; व्यंकोजी खोपडे ठरले ‘जायंट किलर’

बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये भाजपला तीन जागा, राष्ट्रवादीला दोन; प्रस्थापित नेत्यांना धक्का

पुढारी वृत्तसेवा

रवी कोपनर

कात्रज: माजी नगरसेवक, माजी सरपंच आणि प्रभावशाली नेत्यांची रेलचेल असलेल्या बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज या पाचसदस्यीय प्रभागात (क्र. 38) भाजपने तीन, तर राष्ट्रवादी काँग््रेासने दोन जागा पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. ओबीसी आणि सर्वसाधारण गटांतील लढतीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत भाजपने या जागांवर विजय मिळविला. विशेष म्हणजे, शिवसेनेचे (ठाकरे गट) फायरबँड नेते वसंत मोरे, माजी नगरसेवक प्रकाश कदम आणि कात्रज विकास आघाडी व शिवसेनेचे (शिंदे गट) स्वराज बाबर यांना पराभूत करीत व्यंकोजी खोपडे हे ‌‘जायंट किलर‌’ ठरले असून, त्यांच्या विजयाची चर्चा शहरभर रंगली आहे.

भाजपच्या संदीप बेलदरे यांनी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा चार हजार मतांनी पराभव करून धक्का दिला. ‌’ड‌’ गट-भाजपच्या प्रतिभा चोरघे यांनी शिवसेनेच्या प्राजक्ता लिपाणे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या प्रभागात राष्ट्रवादी काँग््रेास, भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग््रेास, अशी चौरंगी लढत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांनी कात्रजचा परिसर ढवळून निघाला होता. उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना गावकी, भावकी, नातेवाईक, स्थलांतरित कामगार, नोकरदारवर्ग, उच्चभ्रू सोसायट्या अशा सर्व घटकांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. राष्ट्रवादी काँग््रेास चार माजी नगरसेवकांसह पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित केलेले ‌‘होम मिनिस्टर‌’ कार्यक्रम आणि बक्षिसांच्या रेलचेलीमुळे वातावरण तापवून निवडणूक एकतर्फी करण्याचा पक्षाचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला.

ओबीसी, सर्वसाधारण गटातील उमेदवारीवरून पक्षांतर्गत विसंवाद वाढला आणि त्याचा थेट परिणाम निकालावर झाला. मात्र, ‌’क‌’ व ‌’ड‌’ गटातून राष्ट्रवादी काँग््रेासच्या स्मिता सुधीर कोंढरे व सीमा युवराज बेलदरे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते नमेश बाबर यांनी गेल्या चार-पाच वर्षांत मूलभूत सुविधा, तसेच विकासकामांसाठी केलेला संघर्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ताकदीने शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवारांनी सुरुवातीला प्रचारात चांगली आघाडी घेतली होती. कात्रजच्या एकात्मिक विकास आराखड्याच्या मुद्द्‌‍यावर त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, हे गणित त्यांच्या एकही उमेदवाराला विजयापर्यंत नेऊ शकले नाही.

शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग््रेास यांची आघाडी देखील पूर्णपणे यशस्वी ठरली नाही. एक जागा काँग््रेासला दिली असतानाही आणखी दोन उमेदवार उभे केल्याने मतांचे विभाजन झाले. शेवटच्या टप्प्यात आयात उमेदवार उभे करावे लागले. परिणामी, वसंत मोरे यांना एकाकी लढावे लागले आणि त्यांना सुमारे 1,000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या प्रभागामधील दत्तनगर, आंबेगाव परिसरातून स्मिता कोंढरे, सीमा बेलदरे, संदीप बेलदरे, प्रतिभा चोरघे हे चार नगरसेवक निवडून आले. तर बालाजीनगर, कात्रज, संतोषनगर, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी या भागातून एकमेव व्यंकोजी खोपडे विजयी झाले.

व्यंकोजी खोपडे ठरले ‌‘जायंट किलर‌’

भाजपचा पारंपरिक मतदार, समाविष्ट गावांतून ‌‘आपल्या हक्काचा नगरसेवक‌’ पाहिजे ही भावना, तसेच सरपंचपदाच्या काळातील विकासकामे व मजबूत जनसंपर्क, या बळावर व्यंकोजी खोपडे यांनी तीन प्रस्थापित नेत्यांना धक्का देत विजय मिळविला. त्यामुळे ते प्रभाग 38 मधील सर्वाधिक चर्चेतील चेहरा ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT