Katraj Navale Rumbler Issue Pudhari
पुणे

Katraj Navale Rumbler Issue: कात्रज–नवले उतारावरील पांढरे रंबलर गुळगुळीत; वेग नियंत्रण हरपलं!

30 किमी प्रतितास वेग अशक्य; रंबलर निष्प्रभ, अनधिकृत पार्किंग आणि उतारामुळे भीषण अपघातांचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे : कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या तीव उतारावर वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर बसवलेल्या वेगनियंत्रक पट्‌‍ट्या (पांढरे रंबलर) बहुतांश ठिकाणी गुळगुळीत झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या उतारावर वाहनांचा वेग कमी होण्याऐवजी आणखी वाढतच आहे. परिणामी, येथे आणखी भीषण अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

नवले पुलाजवळील तीव उतारावर नियंत्रण सुटल्याने गत आठवड्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर नेते मंडळी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहाणी करून येथे प्रतितास 30 वेगमर्यादा निश्चित केली. परंतु, या उतारावरील वेगमर्यादा नियंत्रित करणारे रंबलर बहुतांश ठिकाणी अक्षरश: गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे येथे वाहनांचा वेग नियंत्रित होत नसून, वाहने आणखी सुसाट धावत असल्याचे चित्र शनिवारी (दि.22) पाहाणीदरम्यान समोर आले.

तीव उतारावर 30 किमी वेगाची प्रत्यक्ष चाचणी

नवले पुलाच्या तीव उतार परिसरात राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार 30 किमी प्रतितास वेगाची दै. पुढारीकडून शनिवारी प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली. दै.‌’पुढारी‌’ प्रतिनिधीने नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान वाहन चालवत (चालू स्थितीत- न्युट्रल न करता) आणले. मात्र, प्रतिनिधीची गाडी गेअरमध्ये असतानाही त्या गाडीचा वेग ताशी 30 च्या आत आणणे शक्य झाले नाही. तीव उतारामुळे वेग आपोआप 30 च्या पुढे जात होता. जांभुळवाडी बीज संपल्यावर वेग 50 च्या पुढे गेला. दरम्यान, कात्रज नवीन बोगदा ते नवलेपूल दरम्यानच्या रस्त्यावरील अनेक वेगनियंत्रक पट्‌‍ट्या गुळगुळीत झाल्या. त्यामुळे वेगावर नियंत्रण करता आले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने वेग नियंत्रक पट्‌‍ट्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

तीव उतारावर अजूनही ‌‘अनधिकृत पार्किंग‌’

दै.‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीने शनिवारी (दि.22) पुन्हा या परिसरात पाहणी केली. त्यावेळी स्वामी नारायण मंदिराच्या खालील बाजूच्या सेल्फी पॉइंटजवळ आणि समोरील बाजूस अनधिकृत पार्किंग होत असल्याचे दिसून आले. भीषण अपघातानंतर वाहतूक पोलिस प्रशासनाने या महत्त्वाच्या ठिकाणी कमीत कमी एक मनुष्यबळ तरी तैनात करणे गरजेचे आहे. मात्र, शनिवारी केलेल्या पाहाणीवेळी याठिकाणी एकही पोलिस कर्मचारी दिसला नाही. तसेच याउलट येथे एक अवजड वाहन, एक टेम्पोने अनधिकृत पार्किंग केल्याचे दिसले. तर त्याच्या समोरील महामार्गावर एका टेम्पोतून दुसऱ्या टेम्पोमध्ये मालाची लोडींग करताना दिसले.

पीएमपीलाही ताशी 30 ची वेगमर्यादा

पीएमपीच्या महामार्गावरून प्रवासी सेवा

पुरवणाऱ्या बसगाड्यांना नवले पूल परिसरात प्रतितास वेगमर्यादा 30 करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिले आहेत. महामार्गावरील भीषण अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देवरे यांनी दिली.

मी अनेकदा कात्रज नवीन बोगद्याने माझी गाडी घेऊन येत असतो. मात्र, येथील तीव उतारामुळे गाडीचा स्पीड 30 करणे शक्य नाही. तसेच, प्रशासनाने पूर्वी बसवलेल्या पांढऱ्या रंबलर पट्‌‍ट्या वाहने जाऊन, घर्षण झाल्याने गुळगुळीत झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने पहिल्यांदा प्रत्यक्ष 30 ची चाचणी या मार्गावर घ्यावी. तसेच पांढऱ्या वेग नियंत्रक पट्‌‍ट्या नव्याने बसवाव्यात.
नितीन इंगुळकर, वाहनचालक

नवले पूल परिसरात राष्ट्रीय महामार्गावरच एका टेम्पोतून दुसऱ्या टेम्पोत मालाचे लोडिंग केले जात होते. अशा असुरक्षित पार्किंगमुळेही अपघाताच्या घटना वाढत आहेत. दुसऱ्या छायाचित्रात कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर गुळगुळीत झालेले रंबलर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT