

मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील सादलगाव परिसरात बिबट्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटप्रवण क्षेत्रात शाळांना वेळापत्रक बदलण्याची सूचना जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्यानंतर काही शाळांनी वेळापत्रक बदल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 21) दुपारी 5 वाजेच्या सुमारास सादलगाव (ता. शिरूर) येथील शेतकरी विनायक पवार हे उसाच्या शेताला पाणी पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत साहेबराव साळुंके हेदेखील होते. पवार पाणी पाहण्यासाठी शेतामध्ये शिरले तर दुचाकीजवळ साहेबराव साळुंके थांबले होते. अचानक शेजारच्या उसातून बिबट्या बाहेर आला आणि थेट साळुंकेंसमोर उभा राहिला. बिबट्याला पाहताच त्यांनी
मोठ्याने आरडाओरडा करत जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारच्या शेतातील लोक येताच बिबट्या पळून गेला. दुसऱ्या घटनेत परिसरातील महिलांना कापूस गोळा करत असताना दोन बिबटे दिसून आले.
वाडा : गुंडाळवाडी (ता. खेड) येथे लावल्येल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट सुमारे 3 वर्ष वय असलेली मादी असल्याचे वनपरिमंडल अधिकारी विजयकुमार कदम यांनी सांगीतले. खेडच्या पश्चिम भागात पंधरा दिवसांच्या आत ही दुसरी बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. यापूर्वी वाळद येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दि. 6 नोव्हेंबर रोजी बिबट्याची मादी जेरबंद झाली होती.