कात्रज: कात्रज येथील ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलावात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या पाण्यावर आणि काठालगत शेकडो मृत मासे दिसून येत आहेत.
नानासाहेब पेशवे तलाव नागरिकांच्या विरंगुळ्याचे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सकाळ आणि सायंकाळी या ठिकाणी हजारो नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. परंतु सध्या तलाव परिसरात मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना येथे थांबणेही कठीण झाले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत माशांचा खच पडल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. या माशांचे लचके तोडण्यासाठी मोठ्या संख्येने कावळे आणि भटकी श्वाने परिसरात जमा होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
माशांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी तलावातील सांडपाणी किंवा प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील काही नाल्यातील सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्यास पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांचा मृत्यू होऊ शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माशांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या देखरेखीच्या कामावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मृत माशांमुळे दुर्गंधी पसरल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून या तलावावर फिरण्यासाठी जाणेही अवघड झाले आहे. महापालिकेने तातडीने हे मृत मासे बाहेर काढून तलावाची स्वच्छता करावी; अन्यथा रोगराई वाढेल आणि नागरिकांना या ठिकाणी फिरताही येणार नाही.हेमंत धायबर, रहिवासी, कात्रज
तलावातील माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती घेतली जात आहोत. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले असून, तलावातील मृत मासे बाहेर काढून स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे.योगेश ताम्हाणे, उद्यान निरीक्षक, महापालिका