Katraj Health Center Inauguration Pudhari
पुणे

Katraj Health Center Inauguration: कात्रज जाधवनगर आरोग्य केंद्र सुरू; भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगला

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अखेर सुरू; मात्र लोकार्पणावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

कात्रज: कात्रज परिसरातील जाधवनगर येथे महापालिकेच्या महाराणी येसूबाईसाहेब बहुउद्देशीय इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आरोग्य केंद्राचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. २७) या आरोग्य केंद्राचे दोन वेगवेगळे लोकार्पण सोहळे पार पडल्याने श्रेयवादाची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

जाधवनगर, दत्तनगर, भारतनगर, निंबाळकरवस्ती, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी आदी परिसरांतील हजारो नागरिकांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठा लाभ होणार आहे. भाजपच्या वतीने सकाळी माजी नगरसेविका राणी भोसले यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भोसले यांनी आपल्या कार्यकाळात या इमारासाठी निधी उपलब्ध करुन दिला होता.

नगरसेवक व्यंकोजी खोपडे म्हणाले, ‘हे आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागरिकांना माफक दरात एमआरआय, एक्स-रे, सिटीस्कॅन आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.’

या वेळी प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेविक प्रतिभा चोरगे, नगरसेवक संदीप बेलदरे, रोहिदास चोरगे, रायबा भोसले, कुणाल बेलदरे, गणेश निंबाळकर, नीलेश धनावडे, अखिल नायर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सायंकाळी आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

नगरसेविका स्मिता कोंढरे म्हणाल्या, ‘नागरिकांच्या कररूपी पैशांतून उभारण्यात आलेली इमारत नागरी सेवेसाठी वापरली जावी, या उद्देशाने महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. विद्युत व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून आता केंद्र सुरू होत असल्याचे समाधान आहे.’ या वेळी विरोधी पक्षनेते नीलेश निकम, सुरेश कदम, वसंत मोरे, सुधीर कोंढरे, दीपक गुजर, विकास फाटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य केंद्राचा नागरिकांनी लाभ द्यावा, असे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT