पुणे: प्रभाग क्र 25, 27 आणि 28 मध्ये कमळ फुलणार हा विश्वास उमेदवारांसह कार्यकर्त्यांना देखील असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार न्यु इंग्लीश स्कूल शाळेसमोरील टिळक रस्त्यावर सकाळी दहा वाजताच गोळा झाले होते. फेरीनिहाय आकडे आल्यानंतर गर्दीतील कार्यकर्त्यांच्या घोषणांनी टिळक रस्ता दणाणून सोडला होता. अपेक्षेप्रमाणे याठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आणि कसब्यात पुन्हा एकदा कमळाचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले.
कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शनिवार पेठ - म. फुले मंडई हा प्रभाग २५, नवी पेठ - पर्वती हा प्रभाग क्रमांक २७ आणि २८ प्रभाग हा जनता वसाहत - हिंगणे खुर्दचा आहे. या तिन्ही प्रभागांत मिळून विविध पक्षांचे अधिकृत तसेच अपक्ष मिळून ८४ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
टिळक रोडवरील न्यु इंग्लीश स्कूल शाळेत प्रभाग क्रमांक 25,27 आणि 28 या प्रभागाची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली. परंतु प्रभाग क्रमांक 25 च्या दोन फे-या झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मशिन चुकीच्या जोडल्या गेल्या आहेत, सिल नसलेल्या मशिन आहेत असे सांगत गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यानंतर तब्बल एक ते दिड तास मतमोजणी बंद करण्यात आली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड.रूपाली ठोंबरे यांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रातून बाहेर पडण्यास सांगून मतमोजणीवर बहिष्कार घातल्याचे स्पष्ट केले. परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना लिड एवढे जास्त होते की त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळे साधारण साडेबारानंतर पुन्हा मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 25 मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. दूपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक 27 ची मतमोजणी सुरू झाली आणि साधारण साडेचार वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली. प्रभाग क्रमांक 27 मध्ये देखील चारही उमेदवार भाजपचे निवडून आले. तर साडेचार नंतर प्रभाग क्रमांक 28 ची मतमोजणी सुरू झाली. सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत संबंधित मतमोजणी सुरू होती.
प्रभागातील कार्यकर्त्यांची गेटवर हजेरी
तीन प्रभागांची मतमोजणी होणार होती. त्यामुळे मतमोजणी सुरू झाल्याचे कळताच संबंधित प्रभागातील कार्यकर्ते न्यु इंग्लीश स्कूल शाळेच्या गेटवर जमा व्हायचे. संबंधित कार्यकर्त्यांना शाळेच्या गेटपासून आतमध्ये सोडले जात नव्हते. त्यामुळे आतून एक फेरी संपली की कोण आघाडीवर आहे याचा निरोप घेऊन आतील कार्यकर्ते गेटवर यायचे आणि तो निरोप गर्दीला कळताच एकच जल्लोष केला जायचा असा प्रकार तीन्ही प्रभागांच्या मतमोजणीवेळी पहायला मिळाला.
भाजपच्या कार्यकर्त्यांची विजयी मिरवणुक
प्रभाग क्रमांक 25 मध्ये स्वप्नाली पंडीत, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, स्वरादा बापट आणि कुणाल टिळक यांचा विजय झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची प्रचंड उधळण केली. त्यामुळे टिळक रस्ता पूर्ण गुलालमय झाल्याचे पहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून घेत विजयी मिरवणूक काढल्याचे दिसून आले. तर विजयी उमेदवारांच्या चेह-यावरचे विजयी भाव आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी टिळक रस्त्यावर एक अभूतपूर्व जल्लोष पहायला मिळत होता. हाच प्रकार प्रभाग क्रमांक 27 मध्ये अमर आवाळे, स्मिता वस्ते, लता गौड आणि धिरज घाटे या उमेदवारांचा विजय झाल्यानंतर पहायला मिळाला. त्यामुळे टिळक रस्त्यावर दिवसभर भाजपच्या कार्यकर्त्यांचा बोलबाला असल्याचे दिसून आले.
ॲड. रूपाली ठोंबरे यांचा मतमोजणीवर बहिष्कार
प्रभाग क्रमांक 25 ची मतमोजणी सुरू असताना मशिन बदलल्या गेल्या आहेत, मशिनला सिल नाही, निवडणुकीसाठी काम करत असलेल्या अधिका-यांचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांशी संगनमत आहे असा आरोप करत ॲड.रूपाली ठोंबरे यांनी मतममोजणीवर बहिष्कार घातला. त्यासाठी त्या मतमोजणी केंद्रातील संरक्षक जाळीवर देखील चढल्या. त्यामुळे मतमोजणी केंद्रात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भात नेमके काय घडले याचा खुलासा देखील निवडणुक अधिका-यांनी केला. परंतु या गोंधळात तब्बल एक ते दिड तास मतमोजणी थांबली असल्याचे चित्र दिसून आले.