शिरूर : कारेगाव (ता. शिरूर) येथे किरकोळ वादातून खून करण्यात आला. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी केवळ दोन तासांत अटक केली. ओमकार सीताराम वाळके व विजय ज्ञानेश्वर जगधने ( दोघेही रा. कारेगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या मारहाणीत सिध्दिकी मोहम्मद यांचा मृत्यू झाला. तर शकील मोहम्मद गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी(दि. 4) पहाटे घडली.(Latest Pune News)
कारेगाव येथील चौकात मोहम्मद शकील मोहम्मद हाजी आणि त्याचा भाऊ सिध्दीकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी (दोन्ही रा. यशईन चौक, कारेगाव) हे पायी जात असताना ओंकार वाळके व त्याचा साथीदार यांच्या स्कुटीचा त्यांना धक्का लागला. यातून झालेल्या किरकोळ वादातून आरोपींनी दि. 4 रोजी पहाटे घरात घुसून दोघांना लाकडी दांडके, प्लास्टिक पाईप व हाताने मारहाण केली. यात सिध्दीकी मोहम्मद यांचा मृत्यू झाला, तर शकील मोहम्मद गंभीर जखमी झाला.
जखमी शकीलच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची सूचना संबंधितांना दिल्या. सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत ओमकार वाळके व विजय जगधने यांना अटक केली. तपासात दोघांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, बम्हा पोवार, अभिमान कोळेकर, विजय सरजिने, वैजनाथ नागरगोजे, योगेश गुंड, गणेश वाघ, प्रविण पिठले, किरण आव्हाड यांनी केली.