पुणे

Pimpri News : कामशेतचा चौक बनला वाहनांचा अड्डा

अमृता चौगुले

कामशेत : नाणे मावळ, अंदर मावळ व पवन मावळ या तिन्ही मावळाला जोडणारी कामशेत ही मोठी बाजारपेठ आहे. दररोज अनेकजण खरेदीसाठी कामशेतला येत असतात; परंतु शहरात पार्किंगची सुविधा नसल्यामुळे येथील छत्रपती शिवाजी चौकात सर्रास वाहने लावली जात आहेत. त्यामुळे दररोज चालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांची दररोज वर्दळ

मावळातील अनेक गावात बस थांबाच नाही. तर, काही ठिकाणी बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. कामशेत या ठिकाणी मध्यवर्ती बाजारपेठ आणि मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने आजूबाजूच्या 70 गावांतील नागरिक येथे खरेदीसाठी येत असतात. पवन मावळ, नाणे मावळ, अंदर मावळ या तिन्ही मावळातील नागरिक बाजारात खरेदीसाठी येत असतात. रेल्वे स्थानक असल्याने नोकरदार, विद्यार्थी व खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांची नेहमीच कायमच वर्दळ असते.

वाहतूककोंडीची समस्या कायम

शिवाय कामशेतमध्ये पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक व्यापारी वाहने लावत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणार्यांना आपली वाहन लावण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे चौक पार्किंगसाठी मोकळा करून देण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. कामशेत बाजारपेठमधील दुकान मालकही त्यांची वाहने दुकानासमोर लावत असतात. त्यामुळे पवन मावळ, नाणे मावळ, अंदर मावळ या तीन मावळातील नागरिकांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होत आहे.

अतिक्रमण कारवाईत एसटी स्थानक पाडले

  • नागरिकांना कामशेतला येण्या-जाण्यासाठी एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसटी स्थानक काही वर्षांपूर्वी अतिक्रमण कारवाईत पाडण्यात आले होते. ते पुन्हा उभारले नसल्याने नागरिकांची खूपच गैरसोय होत आहे.
  • प्रवाशांना उन्हा-पावसात रस्त्यावर थांबावे लागत आहे. निवारा शेडची जागेवर बेशिस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना दुकानाच्या आडोशाला उभे राहावे लागत आहे.
  • काही दुकानदार दुकानापुढे उभे राहू देतात. पण काही दुकानदार उभे राहू देत नाहीत.
    त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT