माणसाप्रमाणे उंदीरही करतात कल्पना! | पुढारी

माणसाप्रमाणे उंदीरही करतात कल्पना!

वॉशिंग्टन : प्रयोगशाळेत विविध प्रयोग करण्यासाठी काही उंदीर ठेवलेले असतात. अशा उंदरांमध्येही माणसाप्रमाणे कल्पना करण्याची क्षमता असते असे तुम्हाला वाटते का? त्याचे उत्तर ‘होय’ असे आहे! एका नव्या संशोधनामधून उंदरांमधील ही कल्पनाशक्ती समोर आली आहे.

होवार्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांना असे दिसून आले की उंदरांमध्येही मार्गाचे नियोजन करण्याबाबत विशिष्ट प्रकारची कल्पना करण्याचे सामर्थ्य असते. माणसेही एखाद्या ठिकाणी जायचे असेल त्याच्या मार्गाबाबतची कल्पना करीत असतात. विशेषतः एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर अशी कल्पना केली जात असते. अशी कल्पना करण्याच्या क्षमतेचे नियंत्रण मेंदूतील ‘हिप्पोकॅम्पस’ या भागातून केले जाते. शिकणे आणि स्मरणशक्ती याबाबतचे कार्य हा भाग करीत असतो.

या भागाला दुखापत झालेल्या व्यक्तींमध्ये कल्पना करण्याची क्षमता बाधित झालेली असते, असे व्हर्जिनियामधील ‘एचएचएमआय’च्या जेनेलिया रिसर्च कॅम्पसमधील संशोधक चोंग्सी लाई यांनी सांगितले. मात्र, उंदरांसारख्या अन्य प्राण्यांमध्येही अशी क्षमता असते हे आतापर्यंत संशोधकांना माहिती नव्हते. आता या संशोधनाची माहिती ‘सायन्स’ नियतकालिकात देण्यात आली आहे. या प्रयोगासाठी संशोधकांनी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) आणि ब्रेन-मशिन इंटरफेसचा वापर केला. त्यामधून त्यांना उंदरांमधील ही क्षमता दिसून आली.

संबंधित बातम्या
Back to top button