कमला नेहरू रुग्णालयात बाल अतिदक्षता विभागासाठी डॉक्टरांचा तुटवडा Pudhari
पुणे

Kamla Nehru Hospital: कमला नेहरू रुग्णालयात बाल अतिदक्षता विभागासाठी डॉक्टरांचा तुटवडा

अत्याधुनिक साधनसामग्री असूनही डॉक्टर नाहीत; सेवा ऑडिट करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कमला नेहरू रुग्णालयात आधुनिक बाल अतिदक्षता विभाग (पेडियाट्रिक आयसीयू) उभारला आहे. मात्र, या विभागासाठी आवश्यक डॉक्टर उपलब्ध नसल्याचा खुलासा समोर आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.(Latest Pune News)

या पार्श्वभूमीवर या विभागातील साधनसामग्री आणि डॉक्टरांची तातडीने सेवा तपासणी (ऑडिट) करावी, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी केली आहे.

ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुखांनी कमला नेहरू रुग्णालयाला पत्र लिहून ‌‘महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टर नोकरीसाठी उपलब्ध नाहीत,‌’ असा खुलासा केला आहे. या दाव्याला हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे म्हणत कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी शेकडो डॉक्टर पदवीधर होतात.

मेळघाट, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही डॉक्टर सेवा देतात; मग पुण्यासारख्या विकसित शहरात डॉक्टर मिळत नाहीत, हा दावा विनोदी आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील निष्क्रियता, रिक्त पदांवरील जाणूनबुजूनचा विलंब, डॉक्टरांना अस्थिर सेवा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती, यामुळे आरोग्यसेवेची दुर्दशा झाल्याचे देखील कदम यांनी नमूद केले. अत्याधुनिक उपकरणे असतानाही बाल अतिदक्षता विभाग पूर्णक्षमतेने कार्यरत नसल्याने महापालिकेच्या आरोग्यसेवा धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपकरणे आणि सुविधा असूनही ती वापरात नाहीत, ही गंभीर बाब आहे. बालरुग्णांची सेवा बंद पडणे म्हणजे आरोग्य प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे बाल अतिदक्षता विभागातील सर्व साधनसामग््राी आणि यंत्रणेचे स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करून ती पुन्हा कार्यक्षम करावी तसेच आवश्यक डॉक्टर आणि तंत्रज्ञांची तातडीने नेमणूक करून बालरुग्णसेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी अश्विनी कदम यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT