Pune Porsche Accident Case Pudhari
पुणे

Pune Porsche Accident Case: कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

अल्पवयीनांना कारच्या चाव्या देणारे पालक जबाबदार; पुरावा नष्ट प्रकरणातील तिघांना जामीन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या अशा कृत्यांसाठी त्यांचे पालकच जबाबदार असून, मौजमजेसाठी मुलांच्या हातात कारच्या चाव्या आणि पैसे देणे अजिबात स्वीकारार्ह नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मुलांच्या पालकांवर कडक ताशेरे ओढले आहे. या प्रकरणात पोर्शे कारचालक अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

अमर सतीश गायकवाड, आदित्य अविनाश सुद (वय 52) आणि आशिष सतीश मित्तल (वय 37) अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग, अशपाक मकानदार, ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे अशा दहा जणांविरोधात भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा व भष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 ला नऊ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपी आशिष मित्तलने ॲड. मुकुल रोहतगी, ॲड. सिद्धार्थ दवे, ॲड. ध्वनी शहा, ॲड. आदित्य दिवाण आणि ॲड. श्रद्धा लड्डा यांच्यामार्फत आरोपी आदित्य सूदने ॲड. अबिद मुलाणी यांच्यामार्फत; तर आरोपी अमर गायकवाडने ॲड. सना खान यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.

कल्याणीनगर येथे 18 मे 2024 च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‌‘पोर्शे‌’ कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. कारचालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले.

तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्यांच्या पालकांनी आरोपी डॉक्टरांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. आदित्य सूद व आशिष मित्तल यांनी कारमधील इतर दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिले होते; तर हे नमुने बदलण्यासाठी अमर गायकवाडने डॉक्टरांच्या सहायकाला तीन लाख रुपये दिल्याचे आरोपपत्रात नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT