Kalwadi School FDA Inspection Pudhari
पुणे

Kalwadi School Mid Day Meal: काळवाडी शाळेच्या पोषण आहारावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट साहित्याचे नमुने एफडीएकडून सील

मसाले, डाळी, तेलासह किराणा साहित्याची तपासणी; प्रयोगशाळेच्या अहवालानंतर होणार पुढील कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: काळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेला पोषण आहार योजनेअंतर्गत पुरविण्यात येणारे धान्य व किराणा साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सरपंच तुषार वामन यांनी केली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने गुरुवारी (दि. २१) पोषण आहाराच्या साहित्याची तपासणी केली. तसेच मसाले, डाळी, तेल तसेच इतर साहित्यांचे नमुने ताब्यात घेऊन ते सील केले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी संतोष सावंत म्हणाले की, मसाले, डाळी, तेल व इतर सर्व साहित्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने सील करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल साधारण एक महिनाभरात अपेक्षित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर साहित्याचा दर्जा स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

काळवाडी शाळेत बुधवारी (दि. २०) शालेय पोषण आहाराचे साहित्य घेऊन टेम्पो खाली होत होता. सरपंच तुषार वामन यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन संबंधित साहित्याची पाहणी केली. या वेळी काही धान्य व किराणा साहित्य खराब अथवा निकृष्ट दर्जाचे असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचा दावा सरपंच वामन यांनी केला. साहित्याच्या दर्जाबाबत सरपंचांनी संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी सदर साहित्याचा टेम्पो काळवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उभा करून ठेवला.

दरम्यान, या प्रकाराची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सकाळी दहा वाजता विभागाचे भरारी पथक दाखल झाले. पथकाने टेम्पोमधील शालेय पोषण आहाराच्या साहित्याची पाहणी करून विविध साहित्यांचे नमुने घेतले. मसाले, डाळी, तेल आणि इतर साहित्यांचे नमुने सीलबंद करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्यांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. साहित्य निकृष्ट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास संबंधित पुरवठादार अथवा ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईच्या वेळी पंचायत समिती विभागातील संबंधित अधिकारी, आळेफाटाचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, सरपंच तुषार वामन, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहवालाकडे पालकांचे लक्ष

शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून सकस व गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार झाल्याने चर्चा सुरू झाली आहे. आता अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल काय येतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT