कडूस: कडूस (ता. खेड) येथील भैरवनाथ मंदिरासमोरील कडूस-कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर शुक्रवारी (दि. 27) दुपारी दीडच्या सुमारास पिकअप वाहन नाल्यात कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मागील 13 दिवसांमध्ये या रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकूणच, हा रस्ता म्हणजे ’मौत का कुवाँ’ झाला आहे.
वाकळवाडी येथून कोहिंडे बुद्रुक, वाशेरे गावासाठी साउंड सिस्टिम घेऊन पिकअप वाहन जात होते. या वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट नाल्यात गेले. चालक व सोबत असलेल्या तरुणांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. (Latest Pune News)
दरम्यान, यापूर्वी दि. 14 जून रोजी भैरवनाथ मंदिराजवळील वळणावर कार उलटून चारही चाके वर झाल्याचा प्रकार घडला होता. दुसर्याच दिवशी दि. 15 जून रोजी कालव्याजवळील धोकादायक वळणावर दुसरी कार वेगामुळे नाल्यात गेली होती. आता त्याच रस्त्यावर ही तिसरी घटना घडली.
या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संताप असून, या मार्गावर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप आहे. साबुर्डी चौक ते जुन्या बैलगाडा घाटापर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता उंच असून, दोन्ही बाजूंना खोल नाले आहेत.
शिवाय केबल टाकण्यासाठी झालेल्या खोदकामामुळे नाल्यांची रुंदी वाढली आहे. थोडे जरी वाहन बाजूला गेले, तरी थेट नाल्यात कोसळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या मार्गावर वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याच्या बाजूने साइडपट्ट्या भरून, नाल्यांवर नळ्या टाकाव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
ग्रामस्थांच्या मागण्या
रस्त्यालगत सुरक्षेसाठी साइडपट्ट्या
नाल्यांवर संरक्षक नळ्यांची तातडीने व्यवस्था
अपघातप्रवण ठिकाणी संकेतफलक व अंध वळणांवर रिफ्लेक्टर