नारायणगाव: जुन्नर तालुक्यात सध्या कांदा व गहू काढणीचा हंगाम जोरात सुरू असतानाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. काढणीच्या टप्प्यावर पाऊस झाल्यास कांदा व गहू दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ओतूर, धोलवड, कुमशेत, शिरोली, तेजेवाडी, ओझर, पिंपळवंडी, आळे, राजुरी, बेल्हे आदी भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली असून, सध्या काढणी व वाळवणीचे काम सुरू आहे. त्याचवेळी तालुक्यातील अनेक ठिकाणी गहू कापणीही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत असून, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे.
अचानक पाऊस झाल्यास शेतात काढलेला कांदा भिजून सडण्याची शक्यता आहे, तर कापलेला गहू ओला होऊन त्याची गुणवत्ता घसरण्याचा धोका आहे. उभ्या पिकालाही मोठा फटका बसू शकतो. आधीच बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने आणि मजुरी खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. ओतूर येथील शेतकरी रामदास तांबे म्हणाले, ‘यंदा उत्पादन चांगले आहे, पण काढणीच्या वेळी ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली आहे.’ कुमशेत येथील संदीप शिंदे यांनी “दर नाही, मजुरी वाढली आहे; पावसामुळे कांदा भिजला तर मोठे नुकसान होईल,” असे सांगितले.
तर आळे येथील पंढरीनाथ वामन म्हणाले, ‘गहू कापणी सुरू असतानाच पावसाची भीती सतावत आहे.’ ‘दोन-तीन दिवसांत कापणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मजूर मिळण्यात अडचणी येत आहेत. अशात पाऊस आल्यास उभ्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती आहे,’ असे उंबज अंबादास हांडे यांनी सांगितले. तर नारायणगावचे राजाराम पाटे यांनी ‘गेल्या वर्षीही नुकसान झाले. यंदा पुन्हा तशीच स्थिती असल्याने शासनाने तातडीने मदत करावी,’ अशी मागणी केली.
दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शेतकरी शक्य तितक्या लवकर पिकांची काढणी करून सुरक्षित साठवणुकीकडे वळले आहेत. मात्र, अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.