नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. 11) नव्याने जुन्नर पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात सोडत करण्यात आली. तहसीलदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. या वेळी गटविकास अधिकारी प्रतीक चेन्नावार उपस्थित होते.
97 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी घोषित करण्यात आल्या. सर्वसाधारण महिलांसाठी 29 ग्रामपंचायती, 13 ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तसेच 13 ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जाहीर करण्यात आले. (Latest Pune News)
4 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी तसेच 4 ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले असून, तीन ग्रामपंचायती अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ओतूर ही ग्रामपंचायत मोठी असून, तेथील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव झाले आहे. आ. शरद सोनवणे यांच्या पिंपळवंडी गावचे सरपंचपद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, भाजपनेत्या आशाताई बुचके यांच्या गावचे सरपंचपद देखील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
आळे ही मोठी ग्रामपंचायत असून, त्या ठिकाणचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाले आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे येथील सरपंचपद सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहे. मांजरवाडी गावचे सरपंचपद देखील सर्वसाधारणसाठी जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले यांच्या डिंगोरे गावचे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले असून, माजी आमदार अतुल बेनके यांच्या हिवरे बुद्रुक गावचे सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. नारायणगावचे सरपंचपद देखील अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिरोली बुद्रुक गावचे सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव झाले आहे. वारुळवाडी ही ग्रामपंचायत देखील मोठी असून, त्या ठिकाणचे सरपंचपद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव झाले आहे.