Panshet Dam: धरणफुटीच्या घटनेने ज्येष्ठांना अश्रू अनावर! पानशेत धरणफुटीला आज 64 वर्षे पूर्ण

जुन्या धरणातील पाच खांब फुटीचे साक्षीदार
Panshet Dam
धरणफुटीच्या घटनेने ज्येष्ठांना अश्रू अनावर! पानशेत धरणफुटीला आज 64 वर्षे पूर्णPudhari
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे

खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह दुर्गम डोंगररांगांत विस्तीर्ण पाणलोटक्षेत्र पसरलेल्या पानशेत (तानाजी सागर) धरणफुटीस आज शनिवारी (दि. 12) 64 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील लाखो नागरिक आणि हजारो हेक्टर शेतीची तहान भागविण्यासाठी नवीन पानशेत धरणामधून अविरतपणे पाणीपुरवठा सुरू आहे.

जुन्या धरणाचे पाच खांब नवीन धरणात 1961च्या पानशेत प्रलयाचे साक्ष देत उभे आहेत. महाभयंकर पानशेत प्रलयाच्या कटू आठवणींना उजाळा देताना आजही सिंहगड, पानशेत, खडकवासला, शिवणे, नांदेड या भागांतील ज्येष्ठ नागरिकांना गहिवरून येत आहे! (Latest Pune News)

Panshet Dam
Kharadi Gas leak: खराडीत गॅसवाहिनीतून गळती; आगीत रोहित्र जळून खाक

पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी 1957 मध्ये बांधण्यात आलेले पानशेत धरणाचे बांधकाम पूर्ण होताच पहिल्याच पावसाळ्यात रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्याच्या पायथ्याला उगम पावणार्‍या आंबी नदीच्या महापुरात फुटले. 1961 मध्ये जुलै महिना सुरू झाल्यापासून या भागात जोरदार अतिवृष्टी सुरू होती.

शेतकर्‍यांना घराबाहेर पडता येत नव्हते, जनावरे गोठ्यातच बांधून होती. धरण क्षेत्रातील अतिवृष्टीच्या पुराने 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले. पुण्यातील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खडकवासला धरण फोडावे लागले. पानशेत फुटीचे साक्षीदार असलेले जुन्या धरणाचे खांब आजही धरणाच्या भिंतीजवळ उभे आहेत. ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या जुन्या खडकवासला धरणाचे भग्न अवशेष धरणाखाली आहेत.

Panshet Dam
National Health Survey 2025: देशात सुमारे 13 टक्के बाळांचा जन्म वेळेपूर्वी होतो; आरोग्य सर्वेक्षणातून माहिती समोर

64 वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयाने पानशेत धरणाच्या भिंतीजवळील पानशेत, वांजळवाडीसह कुरण खुर्द, कुरण बुद्रुक, सांगरुण, मांडवी बुद्रुक, मालखेड, खानापूर, गोर्‍हे खुर्द, खडकवासला, शिवणे, नांदेड भागांसह पुणे शहर व परिसरात हाहाकार उडाला होता. या प्रलयाच्या आठवणींना शिवणे येथील वारकरी रामकृष्ण इंगळे, कोंढवे धावडेचे माजी सरपंच बबनराव धावडे आदींनी उजाळा दिला.

सोनापूरचे शेतकरी मारुती शिंदे म्हणाले की, धरणाचे पाणी थेट पानशेत रस्त्यावर आले. पूर कमी करण्यासाठी खडकवासला धरण फोडले. त्यामुळे धरणात बुडालेले ओसाडजाई देवीचे शिवकालीन मंदिर उघडे पडले होते. देवीच्या दर्शनासाठी या भागातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

पानशेत धरण फुटीनंतर धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या डोंगरी भागासह धरण खोर्‍यात पर्जन्यमान यंत्रे बसविली. त्यामुळे या भागात पडणार्‍या पावसाची माहिती नियमितपणे उपलब्ध होऊ लागली. त्यावेळी फोन, मोबाईल अशी सोय नव्हती.

आपापल्या गावातील दिवसभरातील पर्जन्यमानाची नोंद दुसर्‍या दिवशी सकाळी घेऊन कर्मचारी पानशेत येथे येत असत. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्जन्यमानाची नोंद केली जात आहे. पानशेत धरण फुटीनंतर राज्यासह देशभरातील धरणांच्या सुरक्षेसाठी शासनाने वेळोवेळी कायदे, नियमावली तयार केली. तसेच सुधारित जलसुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केलीजात आहे.

पानशेत फुटल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. आमचे गाव धरणाच्या तीरापासून दूर आहे; मात्र जीवाच्या आकांताने मुलं-बाळं घेऊन सांबरेवाडीच्या डोंगरावर गेलो. सायंकाळी पूर ओसरला. त्यानंतर आम्ही घरी आलो. धरणाच्या तीरावर जाऊन पाहिले असता अनेक लोकांची भांडी वाहत होती. अन्नधान्याची डीबले, कणक्या, लाकडे तरंगत होती.

- गुलाब गेणू जावळकर (वय 97), रा. खानापूर

आमच्या गावच्या टकले वस्तीत पुराचे पाणी शिरले. भैरवनाथाचे मंदिर अन् शेतीही बुडाली. माणसे अंगावरील कपड्यांनिशी जीव वाचवण्यासाठी धावत सुटली.

- गुणाजी मारुती माताळे (वय 95), रा. गोर्‍हे खुर्द

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गायी, म्हशी, बैल आदी मृत जनावरे आणि मासे तरंगले होते. प्रलयाने कुरण, पानशेत आदी गावांतील शेतकर्‍यांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना आम्ही अन्नधान्य, जुन्या कपड्यांची मदत दिली.

- बबनराव बाबूराव महामुनी (वय 85), रा. खानापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news