

मंचर: आत्तापर्यंत विहीर, पूल, रस्ता चोरीला गेल्याचे वृत्त होते, परंतु मंचर येथे चक्क घरच चोरीला गेल्याने प्रशासन देखील बुचकळ्यात पडले आहे. पती निधनानंतर उपचारासाठी मुलीकडे राहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे राहते घर गायब झाले असून, या घराची चोरी झाली असावी, या उद्देशाने संबंधित महिलेने मंचर पोलिस ठाणे गाठून निवेदन दिले, तसेच माझे घर कोणी पाडले की चोरीला गेले? असा प्रश्न 80 वर्षीय शकुंतला शिवाजी बागल यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी शकुंतला शिवाजी बागल व त्यांचे पती शिवाजी मारुती बागल व कुटुंबीय 1964 पासून मंचरमध्ये सर्वे नंबर 170/18 अ, जुनी मालमत्ता क्रमांक 1215, नवीन क्रमांक 6/809 वार्ड क्रमांक 6 येथील घरात राहात होते. या घराला दगड-विटा आणि मातीचा पाया होता. पडवी व शौचालयाची सोय होती. (Latest Pune News)
सन 2019 मध्ये शकुंतला बागल यांचे पती शिवाजी यांचे निधन झाले. त्यांना पाच मुले होती. त्यापैकी चार मुलांचे अकाली निधन झाले असून पाचवी मुलगी अनुराधा ही चिखली भोसरी येथे राहात असल्याने शकुंतला या तिच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या.
वर्षभरानंतर म्हणजेच 25 जून 2025 रोजी परत मंचर येथे घरी राहण्यासाठी आल्यानंतर त्या जागी त्यांचे घर नव्हते. मी ज्या ठिकाणी राहात होते, ते घर कुठे गेले? कुणी चोरले की तोडून टाकले? असा प्रश्न शकुंतला बागल यांना पडला असून त्यांनी याबाबत फोटो व कागदपत्रे जोडून नगरपंचायत प्रशासन व पोलिस ठाणे येथे माझे घर मिळवून द्यावे, याबाबत निवेदन दिले आहे.
बागल यांनी नगरपंचायतीत जाऊन पूर्वी राहात असलेल्या घराची थकीत घरपट्टी व चालू रक्कम भरली असून त्यांच्याकडे पावती आहे. याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे बागल यांनी सांगितले.
नागरिकांच्या खासगी मालमत्तेचे रक्षण करणे हे नगरपंचायतीच्या कार्यकक्षेत नाही आणि नगरपंचायतीचा उतारा हा मालकी हक्काचा पुरावा नाही. संबंधित ज्येष्ठ महिला तक्रारदार यांच्याशी संपर्क करून जी काही कायदेशीर कारवाई करणे शक्य आहे, ती केली जाईल.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी, मंचर नगरपंचायत
मंचर शहरात काही बांधकाम व्यावसायिकांनी अनेक गरीब कुटुंबाच्या जागा लाटल्या आहेत. शकुंतला बागल यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन केले जाईल.
- दत्ता गांजाळे, माजी सरपंच, मंचर
घर चोरीला जात नाही. ती अचल वस्तू आहे. हे घर पाडले असेल तर याबाबत चौकशी करू.
- श्रीकांत कंकाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,