नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे सुमारे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी घडल्याने संपूर्ण जुन्नर तालुका हादरला आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याचा संशय असून, या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेचे गांभीर्य उघडकीस आले. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पोलिसांच्या विविध पथकांकडून घटनास्थळाची पाहणी, पुरावे संकलित करणे तसेच घटनेमागील नेमके कारण आणि आरोपीची भूमिका याबाबत तपास सुरू आहे. प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
या घटनेने पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
पिंपळवंडी येथील पोलीस चौकी सतत बंद
या घटनेनंतर पिंपळवंडी गावातील बंद असलेल्या पोलीस चौकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपळवंडी येथील पोलीस चौकी मागील आठ ते दहा वर्षांपासून बंद असून, गावात पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी नियमितपणे उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडे केली.
गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपळवंडी येथील पोलीस चौकी किंवा पोलीस बाह्य ठाणे तातडीने सुरू करून तेथे कायमस्वरूपी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
“गावात पोलीस यंत्रणा प्रत्यक्ष उपलब्ध नसेल तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? भविष्यात अशा गंभीर घटना घडू नयेत यासाठी गावात कायमस्वरूपी पोलीस यंत्रणा कार्यरत असणे अत्यावश्यक आहे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांसमोर मांडली. घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपळवंडी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, तपासाकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.