Shivsena Pudhari
पुणे

Junnar Panchayat Committee Election: जुन्नर पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या सभापतीपदासाठी गटधोरण

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये सभापती व उपसभापतीपदासाठी तणावपूर्ण राजकीय खेळ सुरू

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंचायत समितीत शिवसेनेचे आठ सदस्य आहेत. त्यांना बहुमतासाठी एका मताची गरज आहे. शिवसेना (उबाठा) व भाजपा यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे इतर पक्षांचा जो सदस्य मदत करेल त्याला उपसभापतिपद दिले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून देखील इतर सदस्य आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जुन्नर पंचायत समितीची सदस्यांची संख्या 16 असून, आठ सदस्य शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे सहा सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) व भाजपाने पाठिंबा दिल्यास त्यांचे आठ सदस्य होऊ शकतात. समसमान मते झाल्यावर चिठ्ठीतून सभापती होऊ शकतो.

सध्याचे पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेच्या कमल शेळकंदे सभापती होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला सभापती करण्यासाठी एका मताची गरज आहे. यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे अमित ढोले व भारतीय जनता पक्षाचे संजय वऱ्हाडी यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न आमदार शरद सोनवणे यांच्याकडून सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) सदस्य ढोले यांनी कोणत्याही स्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असा आदेश पक्ष नेतृत्वाने दिल्याचे समजते. त्यामुळे सभापती निवडीसाठी शिवसेनेला भारतीय जनता पक्षाच्या सदस्याची मनधरणी करावी लागणार आहे. जुन्नर तालुक्यात शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे नाते विळ्या-भोपळ्यासारखे आहे. त्यामुळे भाजपा शिवसेनेला सभापती निवडीसाठी सहकार्य करील का? याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपाने शिवसेनेला सभापती निवडीसाठी सहकार्य केल्यास त्यांना उपसभापतिपद मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी आमदार अतुल बेनके यांनी सभापती व उपसभापती निवडीसाठी व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने गटनेतेपदी संभाजी चव्हाण यांची निवड केली आहे. शिवसेना पक्षाने आपल्या गटाचा प्रमुख जयसिंग पोटे यांना केले आहे. या दोन्ही गटांना भाजपा व शिवसेना (उबाठा) यांच्या सदस्यांची मदत झाली तरच पुढचे गणित सोपे होणार आहे. शिवसेनेला फक्त एका सदस्याची गरज असून, राष्ट्रवादीला मात्र बहुमतासाठी तीन सदस्यांची गरज आहे. सभापतिपद हे एस.टी. महिलेसाठी राखीव असून, राष्ट्रवादीकडे आश्विनी केदारी, आशा डावखर हे दोन उमेदवार आहेत. शिवसेनेकडे कमल शेळकंदे या एकमेव उमेदवार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT