ओतूर: डोमेवाडी (ता. जुन्नर) येथे शेतमजुरावर हल्ला करणाऱ्या बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
डोमेवाडी येथील तुकाराम सजन ढोमसे यांच्या शेतातील मजूर गोरख पुनाजी शेळकंदे (वय २९, रा. वालहिवरे, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात शेळकंदे हे किरकोळ जखमी केले होते. त्यानंतर घटनास्थळी शेतकरी तुकाराम ढोमसे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याभागात ओतूर वनविभागाने पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात शनवारी (दि. २२) पहाटे साडेचारच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाला आहे. याबाबत ओतूर वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे कळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किशन खरोडे, किशन केदार, गणपत केदार, गंगाराम जाधव, रोहित लांडे, सचिन गुळवे, संजय भालेकर यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले.
हा बिबट हा मादी जातीचा असून त्याचे अंदाजे वय साडेतीन ते चार वर्षे असावे. त्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल केले. या कामी स्थानिक ग्रामस्थानी सहकार्य केले.
दरम्यान, वनविभागाने रात्री अपरात्री शेतीचे कामे करताना काळजी घ्यावी, बिबट प्रवण क्षेत्रामधून आपली वाहने सावकाश चालवावी व मोठ्याने हॉर्न वाजवावे जेणेकरून वन्य प्राणी त्यांचा रस्ता बदलतील किंवा त्यापासून ते दूर जातील. काही समस्या उद्भवल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.