पिंपरखेड: जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबायला तयार नाही.पारगाव मंगरूळ येथे सोमवारी (दि.१५ ) दुपारी कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर बसलेल्या एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले.
या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पिंपरखेडच्या रोहन बोंबेच्या घटनास्थळा पासून पाचशे मीटरच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पुन्हा गडध झाले आहे.
पारगाव येथे श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांचा मुलगा रोहित बाबू कापरे ( रा.धामणसई , ता.रोहा जि.रायगड ) हा शेताच्या बांधावर बसला होता.याचवेळी परिसरातील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधून रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत ऊसाच्या दाट शेतात नेले.यावेळी महिला मजुरांनी ऊसाच्या शेतात शिरून बिबट्याच्या तावडीतून सोडवून पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु या हल्ल्यात रोहित बाबु कापरे हा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना विशेषतः चिंताजनक आहे कारण, पिंपरखेड येथे काही दिवसांपूर्वी रोहन बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पारगाव मंगरूळ येथील आजची घटना पिंपरखेडच्या या पूर्वीच्या घटनास्थळापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर घडली आहे.
रोहित बाबु कापरे याचा झालेला मृत्यू हा पारगावच्या हद्दीत नोंदवला गेला असला तरी, पिंपरखेडजवळील या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना ठरली आहे.जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन आणि मानवी वस्तीवरील हल्ले वाढत असल्याने वन विभाग आणि स्थानिक प्रशासनावर नागरिकांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची आणि परिसरात पिंजरे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.