Junnar Girl Attack Pudhari
पुणे

Junnar Girl Attack: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हत्याराने निर्घृण हल्ला, आरोपी फरार

आदिवासी वसतिगृहासमोर सकाळी धक्कादायक हल्ला, पोलिसांचा आरोपी शोध सुरु

पुढारी वृत्तसेवा

लेण्याद्री: जुन्नर शहर आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने हादरले आहे. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हत्याराने निर्घृण हल्ला करण्यात आला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौरी संजय सावळे (वय २०) ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी सकाळी नेहमीप्रमाणे वसतिगृह परिसरात असताना महेश मुरलीधर डामसे या तरुणाने अचानक तिच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर अनेक वार केल्याची माहिती समोर येत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

हल्ल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला. स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी जखमी विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आरोपी आणि जखमी विद्यार्थिनी दोघेही एकाच गावातील रहिवासी असून आरोपी हा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थिनीला त्रास देत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या धक्कादायक घटनेमुळे जुन्नर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT