Gas Cylinder Rush Pudhari
पुणे

Junnar Gas Cylinder Rush: इंधनटंचाईच्या अफवांमुळे जुन्नरमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची धावपळ

बेल्हे, राजुरीसह गावांत एजन्सीसमोर गर्दी; प्रशासनाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेल्हे: आखाती देशांमधील युद्धस्थितीचा परिणाम ग्रामीण भागातील जीवनमानावर होऊ लागल्याच्या चर्चेमुळे इंधनटंचाईबाबत अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होईल, या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस घेण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.

जुन्नर तालुक्यात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र मंगळवारी (दि. १०) पाहायला मिळाले. तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे, राजुरी, निमगाव सावा, मंगरुळ, पारगाव, साकोरी, आणे, नळावणे, शिंदेवाडी आणि बोरी बुद्रुक या गावांमध्ये गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

त्यामुळे गॅस वितरणव्यवस्थेवर ताण येत असून, सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे वितरणव्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता असून, गॅस सिलिंडरची साठेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, इंधनटंचाईची शक्यता व्यक्त केली जात असल्याने आळेफाटा, बेल्हे परिसरातील पेट्रोल पंपांवरही वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

पुरवठा अधिकाऱ्यांचे मत

जुन्नर तालुक्यात गॅसपुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. तालुक्यात यासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. पूर्वी २१ दिवसांनी गॅस बुकिंग करता येत होते. मात्र, शासनाने आता २५ दिवसांनी बुकिंगची सुविधा दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅस सिलिंडरची साठेबाजी करू नये. गॅस तसेच इंधनपुरवठा सुरळीत सुरू राहील, असे पुरवठा निरीक्षक अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी यांनी सांगितले.

गॅस वितरकाचे मत

गॅसपुरवठा नियमितपणे सुरू असून, वितरणव्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही. परिसरातील सर्व गावांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती एच. पी. गॅसवितरक अशोक बोरचटे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT