

पुणे: महाविद्यालयांमध्येच आवश्यक दाखले मिळावेत, यासाठी ‘आपले सरकार केंद्र’ सुरू करण्यासाठी येत असलेल्या अडचणी आता दूर केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी 18 महाविद्यालयामंध्ये हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी 10 महाविद्यालयांत केंद्र सुरू करण्याची मान्यता मिळाली होती. ही संख्या आता 28 वर पोचली असून, यात आणखी वाढ होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. हे केंद्र सुरू झाल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध प्रकारचे दाखले लागतात. दरवर्षी या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर आपले सेवा केंद्रात हे दाखले मिळविण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होते. गर्दी झाल्यामुळे त्याचा ताण यंत्रणेवर येतो. अनेकदा हे दाखले वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आपले सरकार’ केंद्रात विविध प्रकारचे सुमारे 69 दाखले उपलब्ध होणार आहेत. एका दाखल्यासाठी जाणाऱ्या एकूण शुल्कापैकी 32.50 रुपये इतकी रक्कम महाविद्यालयास मिळणार आहे. केंद्र चालविण्यासाठी आवश्यक संगणक, प्रिंटर, कागदाच्या सुविधांची रक्कम महाविद्यालयास दिली जाईल. उर्वरित रक्कम ही मिळेल. सरकारला महाविद्यालयांमध्ये विविध पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने केंद्रासाठी स्वतंत्र सुविधा उभी करावी लागणार नाही.
महाविद्यालयांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे दाखले आता जिल्ह्यातील 400 महाविद्यालयांत उपलब्ध करून देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे 100 महाविद्यालयांत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत 70 महाविद्यालयांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानुसार हे सर्व अर्ज मान्यतेसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठविले होते. त्यानुसार 10 अर्जांना मान्यता मिळाली असून, अन्य 60 अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी काढली होती.
केंद्रांची संख्या आता झाली 28
केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयांना ‘लॉगइन आयडी’ देण्यासाठी महाआयटीने पॅनकार्डची मागणी केली होती. अनेक महाविद्यालयांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या मूळ संस्थांकडून चालविले जात असल्याने महाविद्यालयांनी ‘पॅनकार्ड’ नव्हते. त्यामुळे महाविद्यालयांना केंद्र सुरू करता येत नव्हते. ‘पॅनकार्ड’ची असलेली अट शिथिल करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने ‘महाआयटी’ला केली होती. त्यानुसार आता ही अट शिथिल केली आहे. त्यामुळे आणखी 18 महाविद्यालयांना हे केंद्र सुरू करण्याची मान्यता दिली असून, आता एकूण संख्या 28 इतकी झाली आहे.