

यवत: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला असून दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौंड तालुक्यात सध्या सुमारे ९० हजार घरगुती गॅस कनेक्शन असून, परिस्थितीची भीती लक्षात घेऊन अनेक नागरिक गरज नसतानाही आगाऊ गॅस सिलिंडरची मागणी करत आहेत. त्यामुळे अचानक मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने एजन्सींवर ताण वाढला आहे.
मगर गॅस एजन्सीचे संचालक संपत मगर यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा मर्यादित प्रमाणात होत आहे. त्यामुळे घरगुती गॅसची मागणी वाढत असताना व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल, खानावळी आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात गॅसची मागणी करू नये, तसेच उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन गॅस वितरकांकडून करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन आणि गॅस कंपन्या यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले. जर नागरिकांनी संयम बाळगला नाही तर आगामी काही दिवसांत दौंड तालुक्यात गॅस टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना ओतूर (ता.जुन्नर) परिसरातही व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेषतः हॉटेल, धाबे, वडापाव सेंटर व हातगाडी व्यवसायिकांना वापरला जाणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे सध्या कठीण झाले असल्याची माहिती स्थानिक गॅस वितरकांनी दिली आहे.
ओतूर येथील गॅस वितरक दयानंद डुंबरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत मर्यादित प्रमाणात होत असून नवीन ऑर्डर स्वीकारू नयेत, असे निर्देश मिळाले आहेत. त्यामुळे हॉटेल-धाबे तसेच छोटे खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा देखील वापर करता येणार नसल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर अनेक छोटे व्यावसायिक उपासमारीच्या स्थितीत येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ओतूर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरची मागणी असते. सिलेंडर बुक केल्यानंतर काही दिवसांतच पुरवठा सुरळीत मिळत होता. मात्र सध्याच्या परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. घरगुती गॅस पुरवठा अद्याप सुरळीत असला तरी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आखातातील परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेल टंचाई होण्याच्या अफवा पसरल्याने अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत गॅस व इंधन पुरवठ्यावर प्रशासनासह नागरिकांचेही बारकाईने लक्ष लागले असून विशेषतः हॉटेल, धाबे व हातगाडी व्यवसायिकांची अवस्था काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.