नारायणगाव : जुन्नर शहरामधील जुन्या बस स्थानकासमोर असलेल्या इदगाह मैदानाच्या परिसरातील शेततळ्यात सख्ख्या बहीण-भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) घडली. या घटनेमुळे जुन्नर शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आफान अफसर इनामदार (वय 10) आणि रिफत अफसर इनामदार (वय 7, रा. इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर) अशी या भावंडांची नावे आहेत. दरम्यान, या मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वीच नोकरीसाठी दुबईला गेले आहेत. त्यानंतर मुलांची सांभाळ त्यांची आई आणि आजी करीत होती.
ही दोन्ही भावंडे शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता. ही मुले खेळण्यासाठी नेहमीप्रमाणे जातात. परंतु सायंकाळपर्यंत त्यांचा तपास लागला नाही. त्यानंतर याबाबत जुन्नर पोलिस ठाण्याला कळवण्यात आले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ शोधकार्य सुरू केले.
पोलिसांनी ड्रोनच्या सह्याने या भावंडांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेततळ्याच्या काठावर या लहान मुलांचे बूट, चप्पल आढळले. त्यानंतर रात्री 10 वाजता जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण व इतर सदस्यांनी तळ्यात शोध घेतला. त्यावेळी ही मुले पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिकेने जुन्नरच्या शिवछत्रपती रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहिद हसन यांनी तपासणी केली. त्यावेळी त्यांनी चार तासांपूर्वीच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.