Pune Crime Pudhari
पुणे

Pune Crime: निर्दयी बापाने केला साडेतीन वर्षीय चिमुरडीचा खून; सुदैवाने साडेपाच वर्षांचा मुलगा बचावला

आळेफाटा येथील खळबळजनक घटना : बापास अटक

पुढारी वृत्तसेवा

आळेफाटा: एका निर्दयी बापाने स्वतःच्या चिमुरड्या मुलांचा क्रूरपणे गळा दाबून खुनाचा प्रयत्न करून त्यांना जुन्नर हद्दीतील आळेखिंड येथील जंगलात फेकून दिले. या हृदयद्रावक घटनेत साडेतीन वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाला असून, सुदैवाने साडेपाच वर्षांचा मुलगा बचावला.

याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संबंधित निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली. या क्रूर घटनेने आळेफाटा परिसरासह पुणे जिल्हा हादरला आहे.

हर्षदा सागर शिंदे (वय साडेतीन वर्षे, रा. गायकवाडवस्ती, मोशी, ता. हवेली) असे मृत चिमुरडीचे नाव आहे; तर आर्यन (वय साडेपाच) हा या घटनेत सुदैवाने बचावला. याप्रकरणी बाप सागर सदाशिव शिंदे (वय 29) यास अटक करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदेने मंगळवारी (दि. 5) त्याची मुले हर्षदा व आर्यन या दोघांना फिरायला घेऊन जात आहे, असे घरी सांगून संतवाडी-आळेखिंडी परिसरातील जंगलात नेले. तेथे मुलांचा गळा दाबून त्यांना फेकून दिले.

बुधवारी (दि. 6) सकाळी तो मोशीतील घरी आला. घरच्यांनी मुले कुठे आहेत? असे विचारले असता त्याने चाकण येथील खोलीवर मुले ठेवल्याचे सांगितले. दरम्यान जंगलात असलेला आर्यन शुद्धीवर आला. तो पुणे-नाशिक महामार्गावर आला. तेथून जाणाऱ्या लोकांनी त्याला आळेफाटा पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

त्यानुसार पोलिसांनी सागरला चाकण येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुलांना जंगलात गळा दाबून टाकल्याचे सांगितले. त्यानुसार जंगलात रात्रीच्या सुमारास हर्षदाचा मृतदेह मिळून आला. प्रापंचिक कारणावरून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT