

पुणे: ‘अल निनो’चा प्रभाव आणि हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार एन्ट्री केली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. येत्या 3-4 दिवसांत राज्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्याने आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, शुक्रवारी (दि. 8) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आजपासून दोन दिवस कोल्हापूर, सातारा व पुण्याच्या डोंगराळ भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस हजेरी लावेल.
पावसाच्या या संभाव्य धडाक्यामुळे ‘अल निनो’ आणि ‘सुपर निनो’चा प्रभाव पूर्णपणे ओसरणार असून, प्रतिकूल हवामान स्थितीला निसर्ग चोख प्रत्युत्तर देईल, अशी चिन्हे आहेत. दरम्यान, राज्यात गुरुवारी सर्वाधिक तापमान वाशीम येथे 42.6 अंश इतके नोंदले गेले आहे. 9 मेनंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.