नारायणगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यात शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी दिली. (Latest Pune News)
दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विधानसभेला मदत केली. परंतु, निवडणूक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या एकाही नेत्याने कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतले नाही. तसेच विकासकामांचे भूमिपूजन करताना सोबत घेतले नाही. त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे तिघे एकत्र येऊन जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.
आम्ही एकत्र येणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार आहे. ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेला मशालीचा उमेदवार असेल तेथे पंचायत समितीला एक तुतारीचा, धनुष्यबाणाचा उमेदवार असेल.कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जागावाटप केले जाईल. तिन्ही पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करणार असल्याचा दावा दरेकर यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर सुरुवातीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर नेत्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. शिवाय ही निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार असे एकतर्फी जाहीर केले. त्यामुळे आम्हाला आता दुसरा पर्याय उरलेला नाही. एकटे लढून निवडणुकीत धोका पत्करण्यापेक्षा जुन्या मित्रांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो तर आपला विजय होईल असा कार्यकर्त्यांचा सूर आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यात या संदर्भात आमची स्थानिक पातळीवर चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांनी मशाल व तुतारीला सोबत घ्यायला तयारी दर्शविली आहे. जुन्नरचे आमदार अपक्ष जरी असले तरी त्यांची नाळ शिवसेनेची जुळलेली असल्यामुळे तेदेखील आमच्या या आघाडीला साथ देतील याची आम्हाला खात्री आहे. खेड तालुक्यात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे आमच्या सोबत राहून नव्याने स्थापन झालेल्या आघाडीला साथ देणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.