पुणे

काम झालंय.. मास्टरमाइंडला कळवा; आरोपींचा फोन

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे ते थांबले असता नातेवाइकांनी त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्याकडून आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने जुने सिम कार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईमध्ये टाकत केंद्र सरकारच्या संस्थेतील कर्मचारी संतोष कुरपे याला फोन करीत शरद मोहोळचे काम केले असून, ही गोष्ट मास्टरमाइंंडला कळवा, असे सांगितल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.

या प्रकरणात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या केंद्र सरकाराच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर कार्यरत असलेल्या संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) यास गुन्हे शाखेने अटक केली. याखेरीज नितीन अनंता खैरे (वय 34, रा. कोथरूड) व आदित्य विजय गोळे (वय 24) यांना अटक करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आतापर्यंत या प्रकरणात 13 जणांना अटक केली, तर दोन वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

तपासी अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसेच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करवून घेतली. खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मीटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होता.

मोहोळचा खून करण्यासाठी 4 पिस्टल आणले होते. त्यातील 3 पिस्टल जप्त करण्यात आले आहेत. यातील 1 पिस्टलसंदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता त्या वेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपींचा सोबत तपास करायचा असल्याने 5 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी तांबे यांनी केली. त्याला विरोध करताना आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालयाच्या वतीने अ‍ॅड. मयूर दोडके यांनी बाजू मांडली. या वेळी अ‍ॅड. दोडके यांनी सांगितले की, संतोष कुरपे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने उचलला. पलीकडून शरद मोहोळचा खून केला असून, मास्टरला सांगा, असे सांगितले. तसेच, पोलिसांनी चौकशीसाठी 11 जानेवारीला बोलावले होते. त्या वेळी माहिती दिल्याने कमीत कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपीना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

एकूण चार गुन्हे दाखल

पोळेकरने मुळशी तालुक्यातील हडशी आणि अन्य एका ठिकाणी गोळीबाराचा सराव केला होता. याप्रकरणी आता दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी ते पौड पोलिसांना देण्यात येणार आहेत, तर अजय याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डॉक्टरलाही प्रकरण भोवणार

मुन्ना पोळेकर याने अजय नावाच्या तरुणावर गोळीबार केल्यानंतर त्याला उपचारांसाठी पौड येथील एका डॉक्टरकडे दाखल केले होते. दरम्यान, अजयवर उपचार केल्यानंतर याची माहिती संबंधित डॉक्टरने पोलिसांना दिली नाही. अजयवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी एक गोळी आरपार तर दुसरी गोळी चाटून गेली. गोळीबाराची जखम असताना देखील डॉक्टरने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. कदाचित, पोळेकर याने डॉक्टरला धमकी देखील दिली असू शकते. जर डॉक्टरने वेळीच प्रसंगावधान दाखवले असते तर पुढील अनेक गोष्टी पोलिसांना रोखता आल्या असता.

पिस्तुलांची विल्हेवाट लावून हजर राहण्याचा प्लॅन

शरदचा खून केल्यानंतर आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदाराने सातार्‍याच्या दिशेने पळ काढला होता. शरदवर गोळीबार केलेली तीनही पिस्तुले त्याच्यासोबत होती. पोलिसांनी जेव्हा त्यांना पकडले तेव्हा एका गाठोड्यात हे तीनही पिस्तुले बांधलेली मिळून आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नदीमध्ये ही पिस्तुले टाकून देणार होते आणि त्यानंतर तिघे पोलिसांत हजर होणार होते. मात्र, गुन्हे शाखेने आरोपी आणि वकिलांना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT