Jitendra Dudi Orders Action
पुणे: कुंडमळा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांकडून जिल्हाधिकार्यांनी मागविलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 61 पूल धोकादायक आहेत. हे पूल तत्काळ पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या पुलांच्या ठिकाणी धोकादायक पूल म्हणून फलक लावले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकार्यांनी केले आहे. (Latest Pune News)
कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक जुने पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलक, रेल्वे पुलांचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे, राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या वतीने अहवाल सादर केले आहेत.
यात जिल्हा परिषदेच्या ताब्यातील 58 पूल धोकादायक स्थितीत आहेत. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील तीन पूल धोकादायक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी हे धोकादायक पूल बंद करण्याऐवजी ते पाडून टाकण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, कुंडमळा येथील घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या चार जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत.
तर जखमींच्या उपचारांचा पूर्ण खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांचा हा निर्णय केवळ प्रशासनिकच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक निर्णायक पाऊल आहे. धोकादायक पूल पाडल्यामुळे संभाव्य दुर्घटनांना आळा बसेल आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
अशी आहे जिल्ह्यांतील पुलांची स्थिती!
जिल्हा परिषदेच्या दक्षिण आणि उत्तर या दोन विभागांतील मोरी, पूल आणि लहान पूल याची संख्या 5 हजार 518 इतकी आहे. यातील 58 पूल धोकादायक आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागातील पूर्व, दक्षिण, उत्तर आणि प्रकल्पांमध्ये 794 पूल आहेत. त्यातील 3 पूल धोकादायक आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीत असलेली 24 जाहिरात फलके सुस्थितीत असल्याचा अहवाल महामंडळाने दिला आहे.
पीएमआरडीएकडून सर्व बांधकामे सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशानाला प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील धोकादायक पूल बंद करण्याऐवजी ते पाडून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. दरम्यान, कुंडमळा येथील पूल नव्याने बांधण्यात येणार असून, हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. याबाबतची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे