कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा
दौंड तालुक्यातील जिरेगाव तलावात पाणी पोहोचण्यापूर्वी जनाई उपसासिंचन योजना शुक्रवार (दि.20) बंद झाली. योजनेचे पाणी सोडले मात्र, 20 दिवसांनंतरही तलावात पाणी आले नाही. त्यामुळे जिरेगावकरांचा पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पाण्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनाई उपसासिंचन व पावसाच्या पाण्यावर जिरेगावकर अवलंबून असतात. डिसेंबर 2021 पासून तलाव कोरडा आहे. नागरिकांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पाणीपट्टीची काही रक्कम संबंधित विभागाकडे जमा केली. मात्र, अद्याप पाणी मिळाले नाही. पर्याय म्हणून टँकरची मागणी करण्यात आली.
परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. तलावात तसेच विहिरीत पाणी नाही अशी अवस्था या परिसरात आहे. दै." पुढारी " ने जिरेगावच्या पाणी समस्येवर प्रकाश टाकला आहे.जनाई योजनेवरील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास अडचणी असल्याने दि.1 मे रोजी दुसर्या मार्गाने तलावासाठी पाणी सोडले होते. यातून काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अशा होती. मात्र, वीस दिवस उलटून गेले तरी पाणी तलावात पोहोचले नाही. ओढ्यापर्यंत पाणी आले असताना शुक्रवारी 9दि. 20) दुपारी पाण्याचा वेग अतिशय कमी झाला होता. जनाईच्या पाण्याने तलाव भरणे लांबच राहिले असून तलावापर्यंत पाणीच आले नाही अशी स्थिती आहे.
पाण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले. पैसे भरले, पत्र, निवेदन दिले, चर्चा केली. पाठपुरावा केला. प्रशासनाकडून अनेक अडचणी सांगण्यात आल्या. पर्याय समोर ठेवला, तरी पाणी मिळत नसेल तर आम्ही काय करायचे. आता पाण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
– भरत खोमणे, सरपंच जिरेगाव.