पंचवीस लाखांच्या बांधकाम साहित्याची जुन्नरला परस्पर विक्री | पुढारी

पंचवीस लाखांच्या बांधकाम साहित्याची जुन्नरला परस्पर विक्री

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा

जुन्नर तालुक्यातील 8 जणांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या 25 लाख 19 हजार किमतीच्या बांधकाम साहित्याची परस्पर विक्री करून पुरवठादाराची फसवणूक केली आहे. बांधकाम ठेकेदार असल्याचे भासवून या व्यक्तींनी वेळोवेळी तुषार गुलाबराव लाहोरकर (रा. जुन्नर) यांच्या बादशाह तलाव येथील गोडाऊनमधून इमारत बांधकामाला लागणार्‍या 2070 सेंट्रिंग प्लेट्स आणि 375 लोखंडी जॅक भाड्याने घेतले व त्याची परस्पर विक्री केल्याची घटना घडली.

याबाबतची तक्रार लाहोरकर यांनी जुन्नर पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यानुसार सतीश रंगनाथ मुळे, महेश नामदेव डोंगरे, अभिजित जयराम वाघ, अमोल विलास वाघ (चौघे रा. शिंदेमळा, मांजरवाडी), दयानंद गुलाब जाधव (रा. जाधववाडी), अभिजित लक्ष्मण पवार (रा. बुचकेवाडी), बाळासाहेब कृष्णाजी गावडे व संदीप सुभाष गायकवाड (दोघे रा. इंदिरानगर, येडगाव) या आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मागील सप्टेंबरपासून वरील आठ जणांनी स्वतंत्ररीत्या व वेगवेगळ्या महिन्यांत लाहोरकर यांच्याकडून साहित्य भाड्याने नेले.

या वेळी त्यांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड आदी कागदपत्रे दिली होती. ओळखीच्या व्यक्ती नसल्या, तरी तालुक्यातीलच आहेत, या भावनेने लाहोरकर यांनी साहित्य भाड्याने दिले. काही महिन्यांनंतर हे साहित्य सांगितलेल्या साइटवर नसल्याचे लाहोरकर यांना आढळले. तसेच भाडे मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे ही मंडळी देत होती. त्यानंतर या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची शंका आल्यामुळे लाहोरकर यांनी गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button