पुणे: घरकाम करणार्या महिलेने 25 लाख 80 हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बाणेर भागात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. स्नेहल असे महिलेचे नाव आहे. याबाबत विपुलकुमार चाँदकुमार गर्ग (वय 54, रा. सुप्रीम माडोर, पॅन कार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.
गर्ग यांनी आरोपी स्नेहल हिला घरकामासाठी ठेवले आहे. गर्ग आणि त्यांची पत्नी 27 एप्रिल रोजी लखनऊमध्ये नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी निघाले होते. गर्ग यांच्या पत्नीने कपाट उघडले. तेव्हा कपटातील कप्प्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. (Latest Pune News)
गर्ग दाम्पत्य लखनऊला रवाना झाले. विवाह समारंभाहून ते पुण्यात परतले. त्यांनी घरकामासाठी ठेवलेली महिला स्नेहल हिच्या दोन्ही मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधला तेव्हा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गर्ग दाम्पत्याने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घराकामासाठी ठेवलेल्या महिलेने दागिने चोरल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
तिने सोन्याच्या बांगड्या, हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, नथ, मंगळसूत्र असा 25 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक कराड तपास करीत आहेत. पर्वती भागातील मित्रमंडळ कॉलनीत घरकामास ठेवलेल्या महिलेने चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
...यामुळे संशय बळावला?
आरोपी स्नेहल हिने कृत्रिम नख लावले होते. ती कृत्रिम नख वापरत असल्याने गर्ग यांच्या पत्नीने तिला अशा प्रकारचे नख वापरू नको, असे सांगितले होते. गर्ग यांनी कपाटातील तिजोरीत दागिने ठेवले होते. ही डिजिटल लॉक असलेली होती. फेब्रुवारी महिन्यात गर्ग यांच्या पत्नीने तिजोरी उघडली तेव्हा दागिने सुरक्षित होते.
27 एप्रिल रोजी दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दागिने ठेवलेल्या कपाटात कृत्रिम नख सापडले. तेव्हा गर्ग यांच्या पत्नीचा संशय बळावला. त्यांनी घरकामासाठी ठेवलेल्या स्नेहल फाळके हिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तिचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांचे आवाहन
घरकामास ठेवलेल्या नोकर, सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेकदा नोकरांच्या नाव-पत्त्याबाबतची कागदपत्रे घरमालकांकडे नसतात. चोरी झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली जाते. मात्र, नाव-पत्ता नसल्याने त्यांचा माग काढताना अडचण येते. मार्केट यार्ड परिसरात एका सुरक्षा रक्षकाने कापड व्यावसायिकाच्या घरी चोरी केली होती.