जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा अखेरच्या दिवशी शुक्रवारी(दि.21) नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता 10 प्रभागातून 20 जागेसाठी 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.
जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप बारभाई, भाजपाचे सचिन सोनवणे तर शिवसेना शिंदे गटाकडून दिनेश सोनवणे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी बारभाई आणि सोनवणे यांच्यात अनेक वर्षांपासून चुरशीची लढत होत होती. याही वेळी पुन्हा दोन्ही उमेदवार आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे दिनेश सोनवणे तिरंगी सामन्यात उतरल्याने नागरिकांची उत्कंठा वाढली आहे.
नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या 10 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. या पैकी 9 उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने माजी शहराध्यक्ष गणेश भोसले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर भोसले यांनी अर्ज मागे घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंडे यांनी देखील उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज भरला होता. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केल्याने लेंडे यांची बंडखोरी शमली. आता नगरपरिषदेच्या 10 प्रभागात नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी 50 जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने जेजुरी शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उमेदवार मतदारांच्या घरी जावून भेटी घेत आहेत. बुधवारी (दि. 26) उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे.