जेजुरी: जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका झाला. त्यात नवनिर्वाचित नगरसेवकांसह सुमारे 16 जण गंभीररीत्या भाजले आहेत. या घटनेत नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग््रेासच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे, प्रभाग क्र.5 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत होरपळलेल्या जखमींना तातडीने खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
येथील मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि त्यातून स्फोट झाला. यामध्ये सुमारे 16 जण भाजले असून, यात महिलांचा समावेश आहे.
या घटनेत रूपाली खोमणे, विलास बारभाई, सानिका गाढवे, संस्कार गलांगे, देवल बारभाई, मनीषा चव्हाण, रजनी बारभाई, स्वप्निल लाखे, अनिल बारभाई, गणेश चव्हाण, निशा दादा भालेराव, लक्ष्मी माऊली खोमणे, मोनिका राहुल घाडगे (नगरसेविका), राहुल कृष्णा घाडगे, स्वरूपा जालिंदर खोमणे (नगरसेविका), उमेश भंडलकर आदी जखमी झाले आहेत.
फक्त आदेश, कारवाई नाही
आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन अन्न व औषध भेसळ प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत जेजुरीतील भेसळयुक्त भांडाऱ्यावर कारवाई करावी, असे निवेदन दिले होते. त्यावर कारवाईचे फक्त आदेश देण्यात आले, प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. जेजुरीत वर्षातून आठ ते दहा मोठ्या जत्रा-यात्रा उत्सव होतात. या वेळी लाखो भाविक भंडारा उधळण करीत दिवटी पेटवतात. दुर्दैवाने पुन्हा असा प्रकार घडला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतातरी प्रशासनाने भाविकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असे संभाजी बिगेडचे शहराध्यक्ष तथा माजी विश्वस्त संदीप जगताप आणि शिवराज झगडे यांनी स्पष्ट केले.
गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्वालाग््रााही व भेसळयुक्त भंडाऱ्याने पेट घेऊन मोठा भडका उडाला. भविष्यात भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत नगरपालिका पुढील काळात कठोर पावले उचलणार आहे.जयदीप बारभाई, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, जेजुरी