Jejuri Champashashti Festival Pudhari
पुणे

Jejuri Champashashti Festival: चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावरून काढला तेलहंडा

गुरव–कोळी–वीर–घडशी समाजाच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री खंडोबा-म्हाळसा देवीला तेलवण व हळद अर्पण

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव अतिशय धार्मिक वातावरणात जेजुरी गडावर सुरू आहे. मार्गशीर्ष पंचमीला मंगळवारी (दि. 25) सायंकाळी पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत गडावरून तेलहंडा काढून मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्री खंडोबा व म्हाळसा देवीला तेलवण करून हळद लावण्यात आली.

मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरुवात झाली. मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते, त्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता जेजुरी गडावरून गुरव, कोळी, वीर, घडशी या पुजारी सेवक वर्गाच्या वतीने पारंपरिक पध्दतीने तेलहंडा काढण्यात आला. मंदिरासमोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली.

कोळी समाजाचे विराज लांघी यांनी तेलहंडा डोक्यावर घेतला. घडशी समाजाच्या वतीने सनई-चौघडा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी पुजारी सेवक वर्गाचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, संतोष लांघी, मिलिंद सातभाई, मुन्ना बारभाई, संजय आगलावे, अविनाश सातभाई, सतीश कदम, सागर मोरे, अरुण मोरे, प्रवीण मोरे, घनश्याम मोरे, भालदार अक्षय मोरे, गणेश मोरे, सिद्धार्थ मोरे, नीलेश लांघी, हेमंत लांघी, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

जेजुरी गडावरून वाजत-गाजत तेलहंडा गावाच्या चावडीत आणण्यात आला. चावडीत गावातील सर्व मानकऱ्यांचे नाव पुकारून हंड्यात तेल अर्पण करण्यात आले. मानाचे तेल अर्पण करून तेलहंडा गडावर नेण्यात आला. नंदी चौकात रामोशी समाजाच्या वतीने तेल टाकण्याची सांगता झाली. शेजारतीला मानकरी व भाविकांनी अर्पण केलल्या तेलाने देवाला तेलवन करण्यात आले. त्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीला हळद लावण्यात आली. चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता बुधवारी (दि. 26) चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे. मंदिरातील व घरोघरी बसवलेले देवाचे घट उठवून देवाला पुरणपोळी, वांग्याचे भरीत व रोडगा अर्पण करून तळीभंडारचा कुलधर्म कुलाचार करून उपासनेची सांगता होणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT