JEE Advanced Pudhari
पुणे

JEE Advanced 2026 Exam Date: जेईई अॅडव्हान्स २०२६ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

आयआयटी रुरकीकडून घोषणा; ६ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया, १७ मे रोजी परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जेईई ॲडव्हान्स या प्रवेश परीक्षेचे आयआयटी रुरकीने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 6 एप्रिलपासून सुरू होणार जेईई ॲडव्हान्स परीक्षा 17 मे 2026 रोजी देशभरात आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतातील अग््रागण्य भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चशिक्षण घेण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन्सनंतरची ही निर्णायक पायरी असते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वोच्च तांत्रिक शिक्षण संस्थांचे दरवाजे खुले होतात. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना 11 मे ते 17 मे 2026 या कालावधीत डाउनलोड करता येणार आहे.

परीक्षा एका दिवसात दोन स्वतंत्र सत्रांमध्ये घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी नऊ ते बारा या वेळेत होईल, तर दुसरा पेपर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत होईल. दोन्ही पेपर देणे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवसासाठी तयारी करूनच परीक्षेला हजेरी लावावी लागणार आहे.

पात्रतेच्या निकषांनुसार, जेईई मेन्स 2026 पेपर एकमध्ये पहिल्या 2 लाख 50 हजारांमध्ये स्थान मिळवणारेच विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र असतात. हा नियम सर्व श्रेणींतील विद्यार्थ्यांना लागू आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा जास्तीत जास्त दोन वेळा देता येते आणि त्या संधी सलग दोन वर्षांच्या कालावधीतच वापराव्या लागतात. तसेच, उमेदवाराने पहिल्यांदा बारावीची परीक्षा 2025 किंवा 2026 मध्ये दिलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय बारावीमध्ये असणे अनिवार्य आहे.

यापूर्वी कोणत्याही आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नसतात. परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाणार असून, देशभरातील निश्चित परीक्षा केंद्रांवर तिचे आयोजन केले जाईल. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग््राजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अधिक सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT