

पुणे: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मोठे यश मिळवत 73 पैकी तब्बल 51 जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणूक लढविल्याने सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली असून, कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी तीन माजी आमदारांच्या वारसांमध्ये प्रमुख स्पर्धा पाहायला मिळत आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे आणि भोरचे माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड हे तिघेही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यामध्ये अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या असून, तुषार थोरात आणि विक्रम खुटवड हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत.
दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपारधी गटातून तुषार थोरात यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळविला. दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरात आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यात पारंपरिक राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. कुल यांनी प्रयत्न करूनही थोरात गटाचा पराभव करण्यात अपयश आले.
इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून अंकिता पाटील-ठाकरे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून आपले राजकीय बळ सिद्ध केले आहे, तर भोर तालुक्यातील कामथडी-भोंगवली गटातून विक्रम खुटवड विजयी झाले असून त्यांची पत्नी तृप्ती खुटवड या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. खुटवड कुटुंबाचा स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव मानला जातो.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी आणखी काही नावे चर्चेत आहेत. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील तसेच दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे यांनाही संभाव्य दावेदार मानले जात आहे. अंतिम निर्णय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असून त्या कोणाला अध्यक्षपदाची संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजितदादा जिल्हा परिषदेतील मोठे पद बारामती तालुक्याला नेहमीच देत असत 30 वर्षातील ही प्रथा आहे. अजित दादांच्या निधनानंतर हे पद बारामती तालुक्याला मिळावे अशीही भावना आहे तसे झाल्यास त्यासाठी निंबूत कांबळेश्वर गटातून विजयी झालेले अनुभवी करण खलाटे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो बारामती तालुक्याला अध्यक्ष पद देण्याबाबतही पक्षश्रेष्ठींकडे विचार होऊ शकतो.