कुरकुंभ: दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे घरगुती वादातून जेसीबी मशिनच्या साहाय्याने राहते घर पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सुभाष बारवकर व दीपक शंकर बारवकर (दोघेही रा. कुरकुंभ, ता. दौंड) यांच्यासह दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सागर विलास बारवकर (वय 34, रा. जुनी ग्रामपंचायत कुरकुंभ, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. (Latest Pune News)
फिर्यादी सागर बारवकर हे जुनी ग्रामपंचायत कुरकुंभ येथील वडिलोपार्जित सिटी सर्व्हे नंबर 432 या ठिकाणी घर बांधून 70 वर्षांपासून राहत असून, ते कुरकुंभ एमआयडीसी येथे खासगी नोकरीस आहे. फिर्यादी आणि त्यांचे चुलते शंकर दिनकर बारवकर यांची मुले सुभाष शंकर बारवकर, दीपक शंकर बारवकर, प्रवीण शंकर बारवकर यांच्यात दोन महिन्यांपासून घराच्या जागेवरून वाद सुरू होते. वरील जागा खाली करा, आमची जागा आहे, नाहीतर घरातील सामान बाहेर टाकून घर पाडून देण्याची धमकी दिली होती. वडिलोपार्जित जागा असून, त्यात आमचाही हिस्सा असल्याचे फिर्यादीने सांगितले होते.
घटनेच्या दिवशी सकाळी फिर्यादीची पत्नी सोनाली आणि आई लता यांचे प्रवीण बारवकर, कार्तिकी बारवकर यांच्याशी वाद झाले होते. त्यामुळे फिर्यादी, त्यांची पत्नी सोनाली व बहीण पूजा हे तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते.
या वेळी दुपारी 1 ते रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी घरातील सामान बाहेर फेकून देऊन घर पाडून नुकसान केले होते. याबाबत चौकशी केली असता कोणतीही नोटीस न देता आकाश सुभाष बारवकर, दीपक शंकर बारवकर यांच्यासह अन्य दोन अज्ञातांनी संगनमत करून जेसीबीच्या साहाय्याने घर पाडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.